आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोट्याच्या शेतीमधील गॅप दूर केल्यास आत्महत्या थांबतील - डॉ. एस. एल. जाधव यांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जमीन, हवामान आणि पावसाची स्थिती अनुकूल असलेल्या जिल्ह्यात एखादे पीक चांगले येतेय म्हणून ते अन्य ठिकाणीही तसे येईलच हे सांगता येत नाही. त्यामुळे पिकास अनुकूल स्थितीचा विचार करूनच ते घेणे फायद्याचे ठरू शकते. हा तोट्याच्या शेतीतील मधला गॅप दूर केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे मौलिक विचार राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे (एमएचएम) संचालक डॉ. एस. एल. जाधव यांनी व्यक्त केले.
 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत विभागीय संशोधन आणि विस्तार सल्लागार समितीची ६१ वी बैठक शनिवारी पैठण रोड येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात झाली त्यात ते बोलत होते. या वेळी केव्हीकेचे संचालक डॉ. डी. पी. वास्कर, कृषी शास्त्रज्ञ बी. बी. भोसले, कृषी सहसंचालक रमेश भताने, शिरीष जमदाडे, प्रो. डी. सी. पाटगावकर, एस. बी. कदम, डॉ. एस. बी. पवार, आठही जिल्ह्यांतील कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी उपलब्ध तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे आवाहनही डाॅ. जाधव यांनी केले.
 
नवीन वाण काळाची गरज : दहावर्षे आयुर्मानाचे वाण नसल्याने उत्पादकतेत घट येते. खर्च अधिक अन् उत्पादन कमी यामुळे तोट्याची शेती राष्ट्रहितासाठी मारक ठरत आहे. याचा गांभीर्याने विचार करून दर्जेदार वाण विकसित करणे काळाची गरज असल्याचे डॉ. जाधव म्हणाले. 
 
पॉवर पॉइंट प्रझेंटेशनद्वारे माहिती : १४ ते १६ डिसेंबर दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली असून देश-विदेशातील कृषी शास्त्रज्ञ यात भाग घेणार असल्याचे डॉ. वास्कर यांनी सांगितले. औरंगाबाद आणि लातूर विभागातील पेरणी क्षेत्र, पीक लागवडीनिहाय क्षेत्र, अपेक्षित उत्पादकता याविषयी पॉवर पॉइंट प्रझेंटेशनद्वारे माहिती यावेळी देण्यात आली. 
 
मधला गॅप म्हणजे काय ? 
बीडचे शेतकरी हेक्टरी क्विंटल ४० किलो उत्पादन घेतात. उस्मानाबादेत क्विंटल ६८, नांदेड क्विंटल ३२, लातूरमध्ये तूर ३३ क्विंटल ८४ किलो, बीडमध्ये क्विंटल ७८ किलोचे उत्पादन आले. म्हणजे बीडमधील शेती सोयबीन उत्पादनासाठी, तर लातूरची तूर उत्पादनासाठी पोषक आहे. उर्वरित जिल्ह्यात ते पीक घेणे उचित नाही. एकरी ७५ किलो सोयाबीन पेरायचे अन् उत्पादन ३५० किलो घ्यायचे, ही चुकीची शेती प्रथम बंद केली पाहिजे. तोट्यातील शेतीतला हा मधला गॅप दूर करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या कौशल्यपूर्ण वापराबाबत शेतकऱ्यांना साक्षर करावे. आपली जमीन ज्या पिकास अनुकूल आहे ते पीक कमी खर्चात घेण्याचे तंत्रज्ञान अवगत करण्याचे आवाहन डॉ. जाधव यांनी शेतकऱ्यांना केले.
 
कर्ज फेडीचे दालन उघडे करा 
कर्ज घेण्यासाठी दालने उघडी आहेत, पण कर्ज परतफेडीचे दालन कुणी उघडे करून देत नाही. परिणामी कर्जबाजारीपणा वाढत जाऊन शेतकरी आत्महत्या करताहेत. हे थांबवायचे असेल पिकांचा बाजारभाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कर्ज घ्यावे. उत्पादन घेतल्याबरोबर कर्ज परतफेड करावी, अशी सूचना त्यांनी केली. कोकणातील शेतकरी हेक्टरी लाख ४० हजारांचे निव्वळ उत्पन्न मिळवतो. दुसरीकडे, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी ४० हजारांचे कर्ज उचलतो. त्याला उत्पन्न मात्र २० ते ३० हजारांचे होते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...