औरंगाबाद - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण, याबाबत चर्चा सुरू असतानाच हे महत्त्वाचे पद मराठवाड्याच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. परंडा (जि. उस्मानाबाद) येथील पक्षाचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदी अतुल भातखळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
ठाकूर सध्या प्रदेश सरचिटणीस आहेत. २००४ मध्ये ते युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या टीममध्येही काम केले आहे. पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्याचे तीन वेळा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.