आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sukhadeo Thorat Speak At Aurangabad On Development Issue

जातीय विषमतेमुळे विकास अशक्य, पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांचे रोखठोक मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जगाप्रमाणे भारतात गरीब-श्रीमंत अशी दरी तर आहेच. तथापि, येथे प्रचंड जातीय आणि धार्मिक विषमतादेखील आहे. त्यामुळेच सर्वसमावेशक विकास होण्यात अडसर निर्माण होत आहे. दलित, आदिवासी, श्रमिक, कष्टकऱ्यांना जर स्वत:चा विकास करून घ्यायचा असेल तर त्यांना शिक्षण घेऊन नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही, पण शिक्षणाच्या खासगीकरणातून नव्या बाजारपेठा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे दलित, आदिवासींना संधी नाकारण्याचे षड्््यंत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याचे रोखठोक मत इंडियन काऔन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्चचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “सर्वसमावेशक विकास : विषमता आणि गरिबी निर्मूलन” या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. विभागप्रमुख डॉ. शिवाजी सांगळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. थोरात म्हणाले, श्रीमंतांच्या उत्पन्नवाढीचे प्रमाण गरिबांच्या तुलनेत खूप अधिक आहे. त्यामुळे देशातील उत्पन्नाचा वाटा श्रीमंतांच्या तुलनेत गरिबांना अधिक प्रमाणात मिळायला हवा. संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे म्हटले खरे, पण स्वातंत्र्योत्तर काळात दुर्दऔवाने गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला. देशातील जातीय विषमतेमुळे दलित, आदिवासींना आणि श्रमिक, कष्टकरी, शेतमजुरांना अजूनही दोनवे‌ळच्या जेवणासाठी ‘नरेगा’सारख्या योजनांवर विसंबून राहावे लागते. याउलट श्रीमंत, उच्चवर्णीयांकडे शेतीची मालकी, कारखानदारी, कॉर्पोरेट जगतातील खासगी उद्योग आणि सेवाक्षेत्रातील नोकऱ्या आहेत. यामुळे त्यांना विकास साधता येतो. या सर्व कारणांचे मूळ येथील जातीय व्यवस्थेच्या पक्षपाती धोरणात असल्याचे डॉ. थोरात यांनी म्हटले.

अध्यक्षीय समारोप कुलगुरूंनी केला. प्रास्ताविक डॉ. सांगळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुनील नरवडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी तर आभार डॉ. धनश्री महाजन यांनी मानले.
महाराष्ट्रातच महापुरुषांची मांदियाळी, मग असे का..?
महात्माफुले यांनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले केले. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम आरक्षणाची संकल्पना मांडली, अमलात आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सर्वांना समान अधिकार देऊन समान विकासाची संधी उपलब्ध करून दिली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अशा महापुरुषांच्या विचारांची मांदियाळी असताना आपण दलित, आदिवासी, मागास, श्रमिक, कष्टकऱ्यांसाठी समान संधी देऊन त्यांचा विकास का करत नाही..? असा सवालही डॉ. थोरात यांनी उपस्थित केला.