आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात राजकारण्यांचा पदयात्रा, बैठकांचा ‘सुपर संडे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रविवारी औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य, फुलंब्री मतदारसंघातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला. रविवारी जास्तीत जास्त मतदार घरी सापडतात हे हेरून गल्लोगल्ली कॉर्नर बैठका, पदयात्रा काढून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्तेही गटागटाने घरोघरी जात भेटीगाठी घेत होते. भोंग्यावरील घोषणांनी रविवारचा निवांत दिवस गजबजाटात बदलला होता.
औरंगाबाद पूर्व
पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांनी रविवारी (५ ऑक्टोबर) मतदारसंघ पिंजून काढला. मतदारसंघात राजेंद्र दर्डा (काँग्रेस), अतुल सावे (भाजप), महापौर कला ओझा (शिवसेना), जुबेर मोतीवाला (राष्ट्रवादी काँग्रेस), डॉ. गफ्फार कादरी (एमआयएम), उत्तमसिंह पवार (अपक्ष) आदींमध्ये लढत आहे. दर्डा यांनी रविवारच्या सुटीचा फायदा घेत एन-७ व एन-८ भागात पदयात्रा काढली. अतुल सावे यांनी कैलासनगर, राजाबाजार, मोंढा नाका परिसरात मतदारांच्या भेटी घेतल्या. कैलासनगर परिसरात सावे यांच्या मतदार संपर्क अभियानाला मोठी गर्दी उसळली होती. घरोघरी जाऊन सावे मतदान करण्याची विनंती मतदारांना करत होते. उमेदवारांना यानंतर १२ ऑक्टोबर हा एकमेव रविवारचा दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. डॉ. गफ्फार कादरी यांनी शहागंज, रोशन गेट, मकसूद कॉलनी आदी भागांत घरोघरी जाऊन प्रचार केला. जुबेर मोतीवाला यांनी चाकरमान्या मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. उत्तमसिंह पवार यांनी सिद्धार्थनगर, आविष्कार कॉलनी, चिश्तिया कॉलनी, सावरकरनगर आदी भागांमध्ये जाऊन भेटी घेतल्या. ठिकठिकाणी उमेदवारांच्याही एकमेकांशी भेटी झाल्या.
औरंगाबाद पश्चिम
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आज सर्वच उमेदवारांनी सकाळपासून प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला. खास करून शहरी भागात नोकरदार मतदारांना गाठण्याची रविवारची सुवर्णसंधी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी साधली. बन्सीलालनगर, वेदांतनगर, ज्योतीनगर, विश्वभारती कॉलनी, उल्कानगरी, देवानगरी, सातारा परिसर, श्रेयनगर, न्यू उस्मानपुरा आदी भागांत पक्ष कार्यकर्ते गटागटाने घरोघरी जात भेटीगाठी घेत होते. अनेक भागांत उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या निघाल्या. त्याशिवाय वैयक्तिक भेटीगाठी, बैठकांचे सत्र सुरू होते.

शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी आज महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. याशिवाय विविध भागांत स्वत: उमेदवार व इतरत्र शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत प्रचार केला. सायंकाळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पश्चिममध्ये बैठका घेत मार्गदर्शन केले. काँग्रेसचे जितेंद्र देहाडे यांनीही आज शहराच्या विविध भागांत प्रचारफेऱ्या काढत मतदारांशी संवाद साधला. भेटीगाठींच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावरच सर्वांचा भर होता. भाजपचे मधुकर सावंत यांनी आज भाजपचा प्रभाव असणाऱ्या भागांत प्रचारफेऱ्या काढून मतदारांना साकडे घातले. याशिवाय प्रत्यक्ष भेटींवर अधिक भर दिला. टिळकनगर, ज्योतीनगर, सहकारनगर, विश्वभारती कॉलनी व दर्गा परिसर, सातारा परिसरातील वसाहतींत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करीत जास्तीत जास्त नागरिकांना भेटण्याचा प्रयत्न केला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद दाभाडे, पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे गंगाधर गाडे, अपक्ष उमेदवार जालिंदर शेंडगे यांच्या प्रचाराचाही जोर दिसून आला.रविवारी जास्तीत जास्त मतदार घरी सापडतात हे हेरून जवळपास सर्वच उमेदवारांच्या प्रचाराच्या गाड्या गल्ल्या गल्ल्यांतून फिरत होत्या. त्या भोंग्यावरील घोषणांनी रविवारचा निवांत दिवस गजबजाटात बदलला होता.
औरंगाबाद मध्य
मध्य मतदारसंघात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रविवारी वाहन रॅली अथवा सभा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन भेटणे पसंत केले. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी "आपकाही बच्चा है, दादी आपका वोट देके जीता दो' अशी भावनिक साद घालत सकाळी नऊ वाजेपासूनच लेबर कॉलनी, हर्षनगर, चेलीपुरा आणि परिसरातील गल्ल्यांमध्ये फिरून मतदारांच्या भेटी घेतल्या.

दुसरीकडे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी सकाळ-संध्याकाळ अशा दोन टप्प्यांत पदयात्रा काढली. त्यांनी सकाळी कैलासनगर, संजयनगर, जिन्सी, नवाबपुरा, गवळीपुरा, शहाबाजार, भवानीनगर, दत्तनगर आदी भागांत फिरून मतांचा जोगवा मागितला. या वेळी काही मतदारांनी पाच वर्षांनंतरच आमची गल्ली जैस्वाल यांना दिसल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील परिसर पायाखाली घातला. काँग्रेसचे एम. एम. शेख यांनीही सकाळी आणि संध्याकाळी पदयात्रा काढून प्रचार केला. मनसेचे राज वानखेडे यांनी गाड्या लावून प्रचार केला. त्याचबरोबर आपला माणूस आहे, लक्ष असू द्या, असे म्हणून मतदारांना आवाहन केले.
फुलंब्री मतदारसंघात रॅली, प्रत्यक्ष गाठीभेटी
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी रविवारी मुकुंदवाडी परिसरात रॅली काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल जगताप यांची उपस्थिती होती. चव्हाण यांनी मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे कॉलनी, संघर्षनगर आदी ठिकाणी रॅली काढली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती, सिंचन, पाणी, वीज, रस्ते आदी समस्या सोडवणार असल्याचे सांगितले. मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला.

भाजप उमेदवार माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी चौका ते लाडसावंगी परिसरातील गावांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक गावामध्ये जाऊन बागडेंनी आपणास विजयी करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार आमदार डाॅ. कल्याण काळे यांनी बोरगाव (अर्ज) येथून प्रचारास प्रारंभ केला.

दुपारी करमाड येथे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांच्या सभेला काळे यांनी हजेरी लावली. शिवसेना उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी मुकुंदवाडी परिसरात प्रचार केला.