आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन साहेब कडक आहेत, आत सोडले तर नोकरी जाईल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडकोचे नवनियुक्त मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या कार्यशैलीचा सर्वांनीच धसका घेतला आहे. याचा प्रत्यय मंगळवारी आला. सिडको कार्यालयात प्रवेश करण्यासाठी खुद्द केंद्रेकर पोहोचले, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांनाच अडवले अन् म्हणाला, ‘नवीन मुख्य प्रशासक फार कडक शिस्तीचे आहेत. तुम्हाला दुपारी 2 वाजेपूर्वी आत सोडले तर माझी नोकरी जाईल.’ केंद्रेकरांनी एक शब्दही न उच्चारता कार्यालयात मोबाइलवरून संपर्क साधला, तेव्हा प्रशासक पंजाबराव चव्हाण धावतच आले आणि हेच आपले मोठे साहेब असल्याचे सांगितले. हे ऐकताच त्या सुरक्षा रक्षकाच्या पायाखालची वाळू सरकली, त्याने ताडकन सुनील केंद्रकर यांना सॅल्यूट ठोकला.
केंद्रेकर यांनी मंगळवारी पायीच कार्यालय गाठले. एरव्ही कडक शिस्तीमुळे केंद्रेकर सर्वांना परिचयाचे आहेत, परंतु त्यांच्याच कार्यालयातील एका सुरक्षा रक्षकाने त्यांना शिस्तीचा नमुना दाखवल्याने एका क्षणासाठी तेसुद्धा अवाक् झाले. सिडकोत सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ नागरिकांना प्रवेश असतो, मंगळवार ते गुरुवार दुपारी 2 ते 5.30 या वेळेत प्रवेश दिला जातो. मंगळवारी केंद्रेकर 10.30 ते 11 वाजेदरम्यान मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायीच आले. तेथे दोन सुरक्षा रक्षकांना आत सोडण्यास सांगितले. रक्षकांनी केंद्रेकरांना ओळखले नाही व 2 वाजेनंतर येण्याची विनंती केली.
दिवसभर सिडकोच्या इमारतीमधील विविध विभागांना केंद्रेकर यांनी भेटी दिल्या. प्रत्येक विभागाचे काय काम आहे, कोण विभागप्रमुख आहे, यासंबंधीची माहिती घेतली. एका फाइलचा निपटारा सात दिवसांत व्हावा, असे आदेशच त्यांनी दिले. आपल्यापर्यंत तक्रार यायला नको, असेही त्यांनी बजावले.
अनाठायी गाड्या कमी
सिडकोच्या अधिकार्‍यांना दिलेल्या भाड्याच्या मोटारी केंद्रेकरांनी पहिल्याच दिवशी कमी केल्या. आठ गाड्यांवर दरमहा 20 हजारांचा खर्च व्हायचा. झालरक्षेत्राच्या नावाखाली सहायक अभियंता, नियोजनकारांना गाड्या दिल्या होत्या. झालरच्या कामानंतरही अधिकारी या गाड्या वापरत होते. बचतीसाठी केंद्रेकरांनी दोन अधिकार्‍यांमध्ये एक गाडी ठेवण्याचा निर्णय घेतला. नाशिकचे प्रशासक भट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.