आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही मदत करा, मी निधी देतो, सुनील केंद्रेकरांची अट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - करवसुली कमी असल्याने मनपाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे सर्वच वॉर्डांत कामे होणे अशक्य आहे. म्हणून नगरसेवकांनी करवसुली वाढवण्यास मदत केली तर पूर्वीच्या १५ लाख रुपयांच्या कामांसह आणखी १५ लाख रुपयांची कामे तुमच्या वॉर्डात केली जातील, अशी ग्वाही पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी दिली.
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर दुरुस्तीची कामे होत नसल्याने नळांना दूषित पाणी येत असल्याचा आरोप करून कंपनीच्या एन वन येथील कार्यालयासमोर बुधवारी एमआयएमच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाचे फलित तत्काळ चार किमीच्या पाइपांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनीही आंदोलने करून पाइपची मागणी केली. चार दिवसांपासून कंपनीच्या कार्यालयाला टाळेही ठोकले जात आहे. हा एकूण प्रकार लक्षात घेऊन केंद्रेकरांनी शनिवारी एमआयएमचे नगरसेवक आणि समांतरच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी केंद्रेकर म्हणाले, तुम्हाला पाइप हवे होते, तर तुम्ही थेट मला अथवा शहर अभियंत्यांना कळवायचे होते. तुम्ही कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन कसे काय केले? यापुढे आपल्याला काही अडचण अाल्यास सर्वप्रथम मला किंवा शहर अभियंता यांना कळवा, असे आवाहन केंद्रेकरांनी केले.
आम्ही गेल्या आठ महिन्यांपासून दूषित पाण्याची समस्या सांगत होतो. त्यावर कोणीच मार्ग काढला नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले, असे काही नगरसेवकांनी स्पष्ट केले. काहींनी तर मनपाचे अधिकारी आमची गाऱ्हाणी ऐकत नसल्याचा आरोप केला. ड्रेनेजलाइन, रस्ते दुरुस्तीच्या कामांची तक्रार नगरसेवकांनी केली. यावर आयुक्त म्हणाले, बऱ्यापैकी कर आणि पाणीपट्टी वसुली करण्यात येत आहे.

या पैशांतून १५ लाख रुपयांची कामे प्रत्येक वॉर्डात होणार आहेत. बैठकीला विरोधी पक्षनेता जहांगीर खान, गटनेता नासेर सिद्दिकी, अजिम खान, रफिक चिता, विकास एडके, अब्दुल नाईकवाडी, अहमद शेख, इर्शाद खान, अय्युब जहागीरदार, सायरा बानो, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, के. एल. फालक, तारेख खान, वीरसंग स्वामी आदींची उपस्थिती होती.

सध्या शहरातील अनेक भागांत दूषित पाण्याची समस्या असून दुरुस्तीही आवश्यक आहे. मात्र, त्यातील काही भागांत अत्यावश्यक आणि प्राधान्याने कामे ठरवूनच पाइप देण्यात येतील. माझ्या मंजुरीशिवाय कोणत्याही वॉर्डात पाइप मिळणार नसून कंपनीलाही ते वितरण करता येणार नसल्याचे आदेश केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना दिले. हवे त्यांना पाइप वाटप केल्यास दररोज आंदोलन करून पाइप घेऊन जातील आणि हे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

२५ किमीचे पाइप आणण्याचे आदेश
शहरातील नागरिक आणि नगरसेवकांचा दूषित पाण्याबाबतचा वाढता रोष लक्षात घेऊन केंद्रेकरांनी समांतरच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. दुरुस्तीसाठी २५ किमीचे पाइप आणण्याचे आदेशही देऊनही का आणले नाहीत, असा सवाल कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे उपस्थित करून तत्काळ हे पाइप आणण्याचे आदेश दिले.