आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: अचूक हवामान अंदाजासाठी अाता महासंगणकाचा आधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून महासंगणकाचा (सुपर कॉम्प्युटर) वापर केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केली. परंतु देशस्तरावर जोपर्यंत अचूक डाटा गोळा केला जाणार नाही तोपर्यंत तंतोतंत अंदाजापर्यंत पोहोचणे अवघड असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे.
हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी सन २०१७ पासून महासंगणकाचा वापर केला जाईल, असे विभागाकडून सांगितले जात आहे, परंतु प्रत्यक्षात ही बाब शक्य नसून यासाठी सन २०२२ उजाडेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. गतिशील मान्सून मॉडेलच्या आधारावर सुपर कॉम्प्युटर हवामानाविषयी अचूक माहिती देणार आहे. या मॉडेलची तपासणी पुणे येथील भारतीय हवामान केंद्रात करण्यात आली. या नवीन मॉडेलला हवामानाचे दोन अंदाज वर्तवणारी प्रणाली असेही संबोधले जाते. एका ठरावीक कालावधीतील (तीन ते चार महिने) हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी या मॉडेलचा वापर होऊ शकतो, परंतु अल्प कालावधीत मान्सूनची स्थिती कशी राहील याचा अंदाज केवळ अचूक डाटाच्या आधारावरच गोळा करता येऊ शकतो. याशिवाय उपग्रहाकडून प्राप्त होणारे छोट्या कालावधीतील छायाचित्रे सुपर कॉम्प्युटरला जोडली गेली तर दोन ते तीन तासांत एखाद्या ठिकाणी होणाऱ्या ढगफुटीसारख्या स्थितीची माहिती उपलब्ध होऊ शकेल व जीवितहानी टाळता येईल, असे तज्ज्ञ सांगतात.

गतिशील मॉडेलची तपासणी पूर्ण झाली असून पुढील वर्षापर्यंत याचा वापर सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. नवीन मॉडेलला वापरण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण जुन्या पद्धतीनुसार सांख्यिकीय माहितीचा आधार घेणे सुरूच राहील, असे भारतीय हवामान विभागाचे संचालक एल. एस. राठोड यांनी सांगितले.

अचूक डाटा मिळेेपर्यंत तंताेतंत अंदाज अवघडच
अमेरिकेतील हवामान विभागाकडून जी भाकिते वर्तवली जातात त्याच्या आधारावरच भारतीय हवामानाचा अंदाज लावला जाताे. दोन ते तीन महिन्यांत हवामान कसे राहील याचा अंदाज भारतात वर्तवला जातो. परंतु अल्पकाळात हवामान कसे राहील याची माहिती देणारी यंत्रणा आणखी उपलब्ध झालेली नाही. महासंगणकाचा वापर केला जात असेल तर त्याचा फायदा आहे, परंतु देशस्तरावर जोपर्यंत अचूक डाटा गोळा केला जाणार नाही तोपर्यंत अंदाज तंतोतंत खरा ठरणे अवघड वाटते.
- डॉ. श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएमचे खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्र, नांदेड
बातम्या आणखी आहेत...