आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Power Investment President Arrested News In Marathi

‘सुपर पॉवर’चा 80 कोटींचा घोटाळा उघड, दांपत्य जेरबंद; राज्यात अनेकांची फसवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यात सध्या गाजत असलेल्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाणच्या नातेवाइकाचा 80 कोटींचा घोटाळा उजेडात आला असून सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष दीपक केदू पारखे पाटील व त्याची पत्नी दिव्या पारखे यांना शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली. त्यांना 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पारखे मूळचा नाशिकचा असून तो पुण्यात वास्तव्यास होता. तीन वर्षांपूर्वी त्याने सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापन केली. कंपनीच्या नावाखाली औरंगाबाद, जालना, पुणे, हिंगोली, नांदेड, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांतील लोकांची फसवणूक केली. सुरुवातीला लाखात असलेला हा घोटाळा 80 कोटींच्या घरात गेला.

पडेगाव येथील प्रियदर्शिनी कॉलनीमधील नंदा बळीराम पाटील (50) यांच्या तक्रारीनंतर या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. पाटील यांनी 25 ऑक्टोबर 2013 मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, हवालदार प्रदीप धनवे, विक्रम वाघ, मनोज उईके, महेश उगले, दादासाहेब झारगड, जयर्शी फुके यांनी कारवाई केली. गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना 7 जुलै 2011 मध्ये झाली. गुंतवणूकदारांना दुप्पट रकमेचे आमिष दाखवण्यात आले होते. या कंपनीत 8 ते 9 हजार जणांनी गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे.

काय आहे कंपनीची स्कीम : कंपनी स्थापनेनंतर पारखेने गुंतवणूकदारांकडून 2 लाख 95 हजार रुपये घेतले. नंतर प्रतिमहा 26 हजार 250 देण्याचे आश्वासन दिले. तसेच 24 महिन्यांनंतर गुंतवलेली सर्व रक्कम परत देण्याची थाप मारली होती.

कंपनीसाठी गुंतवणूक करून देणार्‍या आणि सभासद संख्या वाढवणार्‍यांना परदेशी वार्‍यांचे आमिष दाखवले जात होते. त्याला आज अटक केल्यानंतर आमच्या कंपनीचा वर्धापन दिन आहे. आजच मला अटक का केली, असा प्रश्न त्याने तपास अधिकार्‍यांना केला.

‘समृद्धी’चा व्यवसाय दोन वर्षापूर्वी बंद केला : पुणे येथील समृद्धी फु़ड्स इंडिया लिमिटेडचा व्यवसाय हा खरेदी-विक्रीचा असून यामध्ये फसवणूकीचा प्रकार नाही. 3 वर्षापूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय आपण दोन वर्षापूर्वीच बंद केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला अर्थ नसल्याचे समृद्धीचे संचालक महेश मोतेवार यांनी म्हटले आहे.

केबीसीच्या चव्हाणचा नातलग
केबीसीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण हा दीपकचे वडील केदू यांच्याकडे कामाला होता. तो नाशिकच्या पंचवटी भागातील रहिवासी आहे. चव्हाण-केदू हे जवळचे नातेवाईक आहेत. शहरातील सिंधी कॉलनीतील झी टॉवर्स व जालना रोडवरील घई टॉवर्समध्ये त्याने कार्यालये थाटली. येथून त्याने मराठवाड्यात जाळे पसरवले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने या दांपत्यास पुण्याच्या जास्मीनियम कॉम्प्लेक्स, क्यू 401 येथे अटक केली आहे.

कोण आहेत आरोपी
सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट या कंपनीची स्थापना दीपक केदू पारखे, दिव्या दीपक पारखे, शिवाजी एकनाथ पोळ (रा. डिग्रस, ता. सेलू, जि. परभणी), सतीश पोळ, प्रधान आडे, हरीश साळवे आणि शेषराव घुले यांनी केली. पारखे याने त्यांच्या जवळच्या नातेवाइकांकडूनच 17 लाख 85 हजार रुपये गुंतवणुकीसाठी घेतल्याचे समोर आले आहे.

असे फुटले बिंग
नंदा बळीराम पाटील यांनी गुंतवणूक केलेल्या पैशाचा फेब्रुवारी व जून 2014 पर्यंतचा परतावा बँक खात्यात जमा झाली नाही. त्यांनी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत गेली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि घोटाळ्याचे बिंग फुटले. अनेकांना गंडवणारी ही कंपनी बोगस असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.