आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Power Investment,Latest News In Divya Marathi

तक्रार देण्यासाठी दहा जण शहरात झाले दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘केबीसी’पाठोपाठ अनेक गुंतवणूकदारांना गंडा घालून कोट्यवधींचा घोटाळा करणा-या सुपर पॉवर इन्व्हेसमेंट कंपनीने केवळ राज्यातच नव्हे तर परराज्यातही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याचे बिंग फुटताच रविवारी मध्य प्रदेशातून दहा गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी औरंगाबादेत आले. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कारवाईत व्यग्र असल्याने तक्रारदारांना त्यांची भेट घेता आली नाही. दरम्यान, पोलिसांनी ‘सुपर पॉवर’च्या औरंगाबादेतील दोन्ही कार्यालयांची झाडाझडती घेऊन संगणक आणि कागदपत्रे जप्त केली.
या कंपनीचा प्रमुख सूत्रधार दीपक पारखे याचे नाशिकसह औरंगाबादेतही कार्यालय होते. मात्र, एप्रिल महिन्यात त्याने औरंगाबादेतील घई चेंबर्समधील कार्यालय बंद केले होते. त्याचे भाडे अद्यापही थकलेले आहे. दीपक व त्याची पत्नी दिव्या पारखेला पोलिसांनी पुण्यात अटक केली. त्यानंतर त्यांना सिडको पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. रविवारी दुपारी त्यांना चौकशीसाठी बाहेर काढण्यात आले. घई चेंबर येथील कार्यालयात नेऊन त्यांच्यासमक्ष पोलिसांनी तेथील कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर सिंधी कॉलनीतील कार्यालयात जाऊनही झाडाझडती घेण्यात आला.
रविवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू होता. दरम्यान, नाशिक येथील पंचवटी परिसरातील कृष्णनगर येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये कंपनीचे कार्यालय होते. सध्या येथे मेडिकल दुकान आहे. येथे दीपकचा लहान भाऊ किशोर पारखे याने एका संघटनेचे बॅनर लावले आहे. विशेष म्हणजे ही संघटना गुंतवणूकदारांच्या पाठीमागे उभी आहे. याप्रकरणी औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि सहकारी तपास करत आहेत.