आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Power ,Latest News In Divya Marathi,Latest News In Divya Marathi

‘सुपर पॉवर’ने नेपानगरमधूनही उकळले तीन कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘सुपर पॉवर’च्या घोटाळ्याचे जाळे सर्वदूर पसरले आहे. मध्य प्रदेशच्या नेपानगरच्या कागद कारखान्यातील दहा कामगारांनी तीन कोटी रुपये गुंतवले आहेत. ‘दिव्य मराठी’ने रविवारी प्रसिद्ध केलेले वृत्त वाचून नेपानगरमधून दहा तक्रारकर्ते शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी येथील आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली असून, त्यांच्यापाठोपाठ खान्देशचे गुंतवणूकदार पुढे येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मध्य प्रदेशातील नेपानगर येथील कागदाच्या कंपनीतील कर्मचारी कैलास गजानन महाजन हे सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंटचे एजंट आहेत. आयुष्याच्या कमाईची रक्कम त्यांनी या कंपनीत गुंतवली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्या सर्व कामगारांनी महाजनांकडे पैशाचा तगादा लावला. महाजन यांनी या विषयावर कंपनीच्या संचालकांसोबत कामगारांची चर्चा घडवून आणली. संचालकांनी या गुंतवणूकदारांना मनमाड, नाशिक, श्रीरामपूर, पुणे येथे बोलावले. शेवटी नाशिक येथे बोलावून गुंतवणूकदारांना त्याच्या मालकीची जमीन दाखवली. ही जमीन तुम्हाला देतो; पण त्या मोबदल्यात मला आपण 60 लाख रुपये द्या, अशी मागणी त्याने केली. कंगाल झालेल्या गुंतवणूकदारांकडे पैसे नसल्याने त्यांनी पुन्हा महाजनकडे पैशाची मागणी केली. महाजनने त्यांना धमकावणे सुरू केले. ‘माझ्यामागे पैशाचा तगादा लावल्यास मी तुमच्या घरासमोर कुटुंबासह आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्यामुळे गुंतवणूकदारांनी औरंगाबादेत धाव घेतली.

सेवानिवृत्तीची सर्व पुंजी गेली...

1. नेपानगरहून आलेल्या गुंतवणूकदारांमध्ये मंगल कडू जगताप हे बीएसएफमधून सेवानिवृत्त झालेले जवान आहेत. त्यांनी तिवृत्तीची मिळालेली संपूर्ण रक्कम आणि नातेवाइकांचे 72 लाख रुपये गुंतवले आहेत.
2. किशोरीलाल किसनलाल कठोतिया यांनी सांगितले, माझ्यामार्फ त 40 ते 50 लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मोबदला मिळत नसल्याने काही गुंतवणूकदार मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. यामुळे महिनाभरापासून कुटुंबापासून दूर आहे.
स्थानिक ठाण्यात तक्रार द्यावी...
मध्य प्रदेशातील नेपानगर येथून आलेल्या 9 ते 10 तक्रारकर्त्यांचा अर्ज स्वीकारला आहे. त्यांना घटना घडलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना केली आहे. सध्या नंदा पाटील यांच्याशिवाय एकही तक्रारदार आमच्यापर्यंत आलेला नाही.
मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
या भागातील लोकांनाही गंडवले : मध्य प्रदेशातील ब-हाणपूर जिल्ह्यातील नेपानगरसह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, शेंदुर्णी, पहूर, भुसावळमधील अनेकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. नेपानगरच्या गुंतवणूकदारांपाठोपाठ जळगावचे गुंतवणूकदारही तक्रार करण्यासाठी औरंगाबादला येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खान्देशमध्येही जाळे : सुपर पॉवर कंपनीने आपले जाळे मोठमोठ्या शहरांमध्ये पसरले आहे. खान्देशातील जळगाव शहरात या कंपनीने मोठा हात मारला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. जळगावमधील काही व्यापारी आणि शेतकरी तक्रार करण्यासाठी औरंगाबादला येणार असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले.