आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुपर पॉवर’च्या विरोधात आणखी चार तक्रारी; 21 लाखांच्या फसवणुकीचा आरोप; नेपानगरचे पथक दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकवीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत ‘सुपर पॉवर’विरुद्ध आणखी चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी रात्री 11 वाजता मध्य प्रदेशच्या नेपानगरचे पोलिस पथक शहरात दाखल झाले असून तेथेही तीन कोटींपेक्षा अधिक गंडा घालण्यात आला आहे. तर पुण्यावरून जप्त करून आणलेल्या एकूण ऐवजाची किंमत 38 लाख 84 हजार 270 रुपये नोंदवण्यात आली आहे.
26 जुलै रोजी दीपक आणि त्याची पत्नी दिव्या पारखे यांना अटक केल्यानंतर हा घोटाळा 80 कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज होता, मात्र या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सुपर पॉवर कंपनीमध्ये रख्माजी नरहरी कोल्हे (रा. आष्टी, ता. परतूर) यांनी एक लाख 42 हजार, चंद्रकांत तुकाराम जोशी (रा. औढा, जि. हिंगोली) यांनी 7 लाख 50 हजार, कालिदास बाबूराव अंबिलवारे (रा. शेवगा, ता. परतूर) यांनी 2 लाख 89 हजार तर राजेंद्र गोविंद गाढेकर (रा. जालना ) यांनी 9 लाख 87 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदवल्या. या तक्रारीचा समावेश पोलिसांनी नंदा पाटील यांच्या गुन्ह्यात केला आहे. नेपानगर येथेही सुपर पॉवरच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली आहे. तेथील पोलिस पथक शुक्रवारी रात्री 11 वाजता शहरात दाखल झाले. या पथकात सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप कोलते, कॉन्स्टेबल नीरज सैनी यांचा समावेश आहे.
पारखे दांपत्याच्या कोठडीत वाढ
फसवणूकप्रकरणी दीपक आणि दिव्या पारखे यांना 6 आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. निवारे यांनी दिले आहेत.