आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superintending Engineer Arun Kamble News In Marathi

ज्यांच्या काळात घोटाळे त्यांच्याकडेच पाच पदभार, चौकशी सुरू असता सिंचन विभागाचे सोयीचे गणित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या सिंचन विभागात नवनवे प्रताप घडत आहेत. औरंगाबाद पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण कांबळे यांच्या काळात घोटाळे झाले असतानाही त्यांच्याकडे चौकशी अधिकारी व मुख्य अभियंतापदाबरोबर पाच अतिरिक्त पदांचा पदभार सोपवण्यात आला आहे. आता तेच अतिरिक्त पदभार काळात फायलींवर स्वाक्षरी करत आहेत.
मराठवाड्यातील सिंचनाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने विभागनिहाय महामंडळे स्थापन केली. मराठवाड्यातील सिंचन व त्यासाठीच्या प्रक्रियेसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. महामंडळाने सिंचन प्रकल्पाचे निर्णय त्वरित घेऊन काम मार्गी लावता यावे यासाठी कार्यकारी संचालकपदाची निर्मिती करून जास्तीचे अधिकार देण्यात आले. प्रत्येक प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मुंबईला येण्याचे टाळण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतला. नवीन सिंचन प्रकल्प, जायकवाडी मराठवाड्यातील सिंचन व्यवस्थापन, प्रशासकीय निर्णय, अधिकाऱ्यांच्या बदल्या, चौकशी अधिकारी असे सर्व अधिकार कार्यकारी संचालकांना देण्यात आले. चाणाक्ष अधिकाऱ्यांनी याचाच फायदा घेत वरिष्ठांची मर्जी राखून सोयीप्रमाणे कामे करून घेत आर्थिक फायद्याचे अतिरिक्त पदभार स्वत:कडे राखून ठेवले.

औरंगाबाद पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण कांबळे यांच्याकडे मागील आठ वर्षांपासून या पदाचा पदभार आहे. त्यांच्या काळात झालेला वाहन घोटाळा, बॅरेजेस बांधणी, नियमबाह्य पदोन्नत्या, बदल्यांचे प्रकरण उजेडात आले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी महामंडळाअंतर्गत सुरू आहे. असे असतानाही त्यांना नियमबाह्य चार अतिरिक्त वरिष्ठ पदांचा भार देण्यात आला आहे. त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्याच्या फायलींवर तेच स्वाक्षरी करत आहेत.

काय आहे नियम...
शासन निर्णयाप्रमाणे दोनपेक्षा जास्त पदभार देता येत नाहीत.
ज्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवला जाऊ नये.
वरिष्ठांनी तसे केल्यास कारवाई अन् सेवापुस्तिकेत नोंद घ्यावी.

शासनाने याबाबत अध्यादेश काढूनही केवळ कागदोपत्री पूर्तता करून अतिरिक्त पदभाराच्या नावाखाली घोटाळ्याच्या फायली बंद करण्याचा घाट सिंचन विभागात घातला जात आहे. याप्रकरणी कार्यकारी संचालक सी. एस. बिराजदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बोलण्यास नकार दिला
अशाच प्रकारचा अतिरिक्त पदभार जायकवाडी प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता एन.व्ही. शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. मराठवाड्यासाठी महत्त्वाचा असलेला जायकवाडी प्रकल्प ज्या कडा कार्यालयाच्या भरवशावर चालतो त्याच विभागात मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता पद रिक्त आहे. या दोन्ही पदांचा कार्यभार शिंदे यांच्याकडे आहे. मागील एक वर्षात एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही.