आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Rejected Plea Against Releasing Water To Jayakwadi

पाणीबाणी : जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टातही कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्यातील शेवटचा अडसरही मंगळवारी दूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार देत सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पाचही याचिका निकाली काढल्या. वरच्या धरणांतून सोडलेले पाणी जायकवाडीत पोहोचवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी नियंत्रण व देखरेख यंत्रणा उभारावी आणि या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठीच करावा, असे निर्देश सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. अरुण मिश्रा यांनी दिले आहेत.

आडमुठेपणाला चाप
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने १७ ऑक्टोबर २०१५ च्या आदेशानुसार १२.८४ टीएमसी पाणी मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा व पालखेड या धरण समूहातून पैठणच्या जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश पारित केले होते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या आदेशाला नाशिक व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सहकारी साखर कारखाने व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ३० ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. प्रकरणावर पुढील सुनावणी १७ डिसेंबरला ठेवण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि. लोणी, संजिवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना लि. कोपरगाव, नाशिक येथील बाळासाहेब देवराम घुमरे व इतरांनी सर्वोच्च न्यायलयात पाच विशेष अनुमती याचिका दाखल केल्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण व राज्य शासनाच्या वतीने कुणीही बाजू मांडण्यास हजर नव्हते.

पाणी पोहोचवण्याची जबाबदारी मुख्य सचिवांवर, वापर फक्त पिण्यासाठीच
याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
नगर व नाशिकच्या याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, शेखर नाफडे यांनी युक्तिवाद करताना १२.८४ टीएमसी पाणी सोडल्यास पिण्यासाठी पाणीच राहणार नाही. पिके व फळबागा नष्ट होतील. जायकवाडीत २६ टीएमसी मृत साठा असून, ४.५५ टीएमसी जीवंत साठा असल्याने त्याचा वापर केल्यास पाणी सोडण्याची गरज नसल्याचे सांगितले.

जीएमआयडीसीचा युक्तिवाद
जीएमआयडीसीच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. सतीश तळेकर म्हणाले की, मृत साठ्यातील २६ टीएमसी आपत्कालीन वापरासाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. वरच्या धरण समूहात ६२ टक्के साठा अाहे. नगर व नाशिक जिल्ह्यांना केवळ दहा टीएमसीची गरज असताना धरणांत ४५ टीएमसीहून जास्त पाणी आहे. मराठवाड्यात पाणीप्रश्न गंभीर आहे.

ताशी सव्वा किमी वेगाने मुळाचे पाणी जायकवाडीत
नेवासे/औरंगाबाद । तासाला सव्वा किमी या वेगाने मुळा धरणाचे पाणी जायकवाडीत झेपावत आहे. रविवारी रात्री ९ वाजल्यापासून मुळाच्या पाण्याचा प्रवास सुरू झाला आणि मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत हे पाणी कायगाव टोका या जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्ये पोहोचले. मुळामधून ३१७१ निळवंडे दोन हजार क्युसेक पाणी येत आहे. तर गंगापूर ५४३, दारणा ४००० आणि मुकणे एक हजार क्युसेक असा साडेपाच हजार क्युसेक विसर्ग जायकवाडीसाठी सोडला आहे. मूळामधून रविवारी रात्री नऊ वाजता दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर हळुहळु त्याचा विसर्ग वाढवण्यात आला.

सोमवारी सकाळी ६ वाजता हा विसर्ग चार हजार करण्यात आला. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी हा विसर्ग वाढवत ५६८४ इतका करण्यात आला. त्यामुळे पाण्याचा वेग वाढत गेला. मंगळवारी सकाळी सहानंतर हा विसर्ग ४४२५ इतका करण्यात आला आहे. तर सायंकाळी पाच वाजता हा विसर्ग ३१७१ इतका होता. यामध्ये सात केटीवेअरच्या अडथळा पार करत पाण्याने हा प्रवास केला आहे. मूळा ते जायकवाडी साधारण ९० किमी इतके अंतर असून मूळा ते कायगाव टोका जायकवाडीचे बैक वॉटर हे अंतर जवळपास ५५ ते ६० किमी इतके आहे. रात्री दहा वाजेपर्यत हे पाणी जायकवाडीत पोहोचले अशी माहिती गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे उपअधिक्षक अभियंता आऱ. व्ही. देशपांडे यांनी दिली.

तीन वेळा रोखले गंगापूरचे पाणी
नाशिकमधून गंगापूरचे पाणी सोडण्यास विरोधाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री ११ वाजता सोडलेले पाणी अर्ध्या तासातच बंद केले. सोमवारी दुपारी १२ वाजता ते पुन्हा सोडले पण जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्यामुळे चार वाजता थांबवले. चार ते सहा या दोन तासात दोन वेळा पाणी थांवबले होते. संध्याकाळी सहा नंतर ते पुन्हा सुरू केले. पाणी थांबवणे हा कोर्टाचा अवमान आहे. ज्या अधिकाऱ्याने हे आदेश दिले त्याच्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कलम २६ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी अॅड. प्रदीप देशमुख यांनी केली.

नाशिक-नगरचा विरोध सुरुच
पाणी सोडण्याविरोधात नाशिक- नगरमध्ये आंदोलने सुरूच आहेत. मंगळवारी आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर बंद पुकारला होता, तर घोडेगावात शंकरराव गडाख यांनी रास्ता रोको आंदोलन केले. नाशकात घंटानाद झाला.