आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस हा व्रात्य मुलगा, मोदींनी समजूत घालावी, जीएसटीवर सुप्रिया सुळेंचा टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘काँग्रेस म्हणजे शाळेच्या वर्गातील बंड, व्रात्य मुलगा आहे. जीएसटी विधेयकावर या मुलाचे मन वळवण्यासाठी मोदींना समजूतदार पालक- शिक्षकाची भूमिका घ्यावी लागेल,’ असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले. खासदारांच्या आदर्शग्राम योजनेत निधीच न दिल्याने कामे होत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रासाठी शहरात अाल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राष्ट्रवादीने तर जीएसटीला पाठिंबा दिला आहे. पण हे महत्त्वाचे विधेयक अजूनही अडकून पडले आहे. काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. खासदारांच्या आदर्शग्राम योजनेविषयी त्या म्हणाल्या की, सरकारने योजनेचे मार्केटिंग केले, परंतु निधी न दिल्यामुळे काहीच काम होत नाही. केंद्राकडून निव्वळ घोषणाबाजी केली जात अाहे. सरकारचे शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे. शेती, दुष्काळ यासारख्या अनेक मुद्द्यांवर शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी आंदोलन का करत नाही, असे विचारताच "महागाईवर आंदोलन केले ना... इतर कोणत्याच पक्षाने आंदोलन केले नाही. मात्र, केवळ आंदोलन करण्यापेक्षा चर्चा करून प्रश्न सोडवण्यावर आमचा भर आहे,' असे त्यांनी सांगितले.