आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी अल्पवयीन कसे? राष्ट्रवादीच्या शिबिरात तरुणींचा संतप्त सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलीवर बलात्कार करणारे वयाने 18 वर्षांपेक्षा कमी आहेत, म्हणून ते अल्पवयीन कसे ठरू शकतात? त्यांना मेंदू आहे, विचार करण्याची क्षमता आहे, मग असे का, असा संतप्त सवाल करत बलात्कार करणार्‍यांचे वय कितीही असो, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मुलींनी केली.

महात्मा गांधी मिशन संस्थेच्या आइन्स्टाइन सभागृहात युवतींसाठी तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री सुरेश धस, फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, विक्रम गोखले, मधुकरराव मुळे, कदीर मौलाना, सुधाकर सोनवणे, कमाल फारुकी, मुश्ताक अहेमद आदी उपस्थित होते.

तरुणींनी उपस्थितांना प्रश्न विचारून उत्तर देण्यास भाग पाडले. 18 वर्षांखालील मुले सध्या अल्पवयीन समजली जातात. अल्पवयीनसाठी वयोर्मयादा 16 वर आणण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस केल्याचे राज्यमंत्री सुरेश धस यांनी सांगितले.

तीन मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला
या मेळाव्यात मुलींना बोलण्याची संधी दिली गेली. त्या वेळी रोहिणी सोनी, दामिनी पवार, गीता डापके, नंदिनी मिरमेरे यांनी मते मांडली. आडूळ येथील रोहिणीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षणात व्यत्यय येत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे तिच्यासह अन्य दोघींची घरची परिस्थिती सारखीच असल्याने एकूण तिघींनी शिक्षणासाठी मदत करण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

तरुणींनी उपस्थित केलेले मुद्दे
आपला देश गरीब आहे असे म्हणतात, मग निवडणुकीवर इतका खर्च कसा होतो?
दारूबंदीची भाषा शासनाकडून केली जाते, मग कारखानेच बंद का केले जात नाहीत?

चर्चा भरकटल्याने समारोप
आरक्षणामुळे मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात. त्यांना शुल्क लागत नाही, शिवाय शिष्यवृत्ती मिळते. कमी गुण असलेल्या मुली चांगले शिक्षण घेऊ शकतात. केवळ आरक्षणाअभावीच आम्ही मागे राहत आहोत, असे आरोप तरुणींनी केले. शिवाय यास्मिन शेख या विद्यार्थिनीने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताच सुप्रिया यांनी माइक हाती घेऊन प्रश्न सुटत नाहीत तोवर राष्ट्रवादी काँग्रेस तरुणींच्या पाठीशी असल्याचे सांगून उद्घाटन सोहळ्याचा समारोप केला. आर्थिककदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे त्याने सांगितले.

2034 पर्यंत लोकसभाच लढणार
लोकसभेत जाताना रेड कार्पेटवरून एकदा चालत गेले की पुन्हा परत यावे वाटत नाही. त्याची वेगळीच नशा आणि ग्लॅमर आहे ते मुंबईत मुळीच नाही. त्यामुळे 2014 च काय 2019, 2024, 2029 आणि 2034 पर्यंत मी पक्षाकडे बारामती मतदारसंघातून फक्त लोकसभेचेच तिकीट मागेन, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मी कधीच विधानसभा लढणार नाही. लोकसभेच्या लाल कार्पेटवरून चालल्यानंतर परत येण्याची इच्छा नाही. मुंबईच्या मंत्रालयातही लाल कार्पेट आहेच, असे त्यांना विचारले असता, ती मजा येथे नाही. राजकारणातील प्रत्येकाची शेवटची इच्छा ही कायम लोकसभेचे रेड कार्पेट चढण्याचीच असते. त्यामुळे राज्यातील राजकारणात आपण पडणार नाही, असे त्या म्हणाल्या.

सुप्रिया या युवती मेळाव्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. येत्या तीन वर्षांत संघटन पक्के होईल असा त्यांचा दावा आहे. या संघटनेचा तूर्तास राजकीय फायदा किती होईल सांगू शकत नाही. मात्र, या संघटनेचा सामाजिक फायदा मात्र नक्कीच होणार आहे.

पाण्यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी रेटा
या मेळाव्यास उपस्थित तरुणी राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित असल्याने त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिल्यास त्या अडचणीत आणणार नाहीत, अशी आयोजकांची अटकळ असावी. पण ती फोल ठरली. यशस्वी वाघमारे या तरुणीच्या हाती माइक जाताच तिने मराठवाड्याला देण्यात न येणार्‍या पाण्याचा मुद्दा उपस्थित करून भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी केली. मुलींमध्ये राजकीय समज चांगली आली आहे, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी लवकरच शरद पवारांबरोबर बैठक घेऊ, असे सांगितले.

तरुणींना बोलण्याची संधी देणे अंगलट
मेळाव्यात तरुणींना मते मांडण्याची संधी देणे पक्ष नेत्यांच्या चांगलेच अंगलट आले. हाती माइक पडताच मराठा आरक्षणाचे काय, असा सवाल झाला. पक्षच भूमिका सांगेल असे सांगून सुप्रिया सुळे यांनी उत्तराचा चेंडू प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याकडे टोलवला. शेवटी केवळ मराठाच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा सर्वच घटकांना आरक्षण मिळावे, अशी पक्षाची भूमिका असून लवकरच निर्णय होईल, अशी ग्वाही आव्हाड यांना द्यावी लागली.

काय म्हणाल्या तरुणी?
जमावातील एक तरुणी : एमपीएससीमध्ये केवळ दोन गुणांनी मी मागे राहिले. पण माझ्यापेक्षा कमी गुण असलेले आज अधिकारी झाले आहेत. कारण एकच, त्यांना आरक्षण आहे. आम्ही जास्त मेहनत घेऊनही मागेच राहिलो. आम्हाला कधी मिळणार आरक्षण?

दामिनी पवार : केवळ आरक्षण नाही म्हणून ओपनच्या मुली शिकू शकत नाहीत. मला 10 वीत 84 टक्के गुण होते, तरीही शासकीय तंत्रनिकेतनला प्रवेश मिळू शकला नाही. पण माझ्याच बरोबरची मुलगी 55 टक्के गुण मिळूनही तेथे गेली. मला 46 हजार 480 इतके शुल्क भरावे लागले. तिला फक्त सहा हजार रुपये. आता सांगा, माझी यात काय चूक? आमच्याकडे काळा पैसा आहे काय?

यास्मिन शेख : मुस्लिम आरक्षणाचे काय झाले? सच्चर समितीच्या अहवालाचे काय?