आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई मेल्यानंतरही मुले जगतात, हा तर पक्ष आहे! सुप्रिया सुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर बरसल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात पक्षाचा कुणीही कार्यकर्ता-पदाधिकारी संघटनेच्या बाबतीत गंभीर नाही. कुणीही संघटनेला वेळ देत नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीच पक्षाची वाट लावली आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर बरसल्या. याही पुढे जात, सर्वांना फक्त पदे हवी आहेत, त्यांना पक्षाशी काहीही देणे-घेणेच नाही. त्यामुळे, मला असे कार्यकर्ते नकोत, आम्ही बाहेरून येऊन पक्ष चालवू, ज्याला सोडून जायचे आहे, त्याने खुशाल जावे. आई मेल्यावरही पोरं जगतात हा तर केवळ पक्ष आहे असे सुप्रिया सुळे यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खडसावले आहे.
 
पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी हडको येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार सतीश चव्हाण, आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार उषा दराडे, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील व सुधाकर सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे व हरिश्चंद्र लहाणे पाटील, माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद असे नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांत तरुणांचा भरणा होता.
 
या मेळाव्यात आधी विविध सेलचे अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यात ऐनवेळी आलेल्यांना पक्षात महत्व दिले जाते, जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाते, पदे दिले जात नाहीत, वशिलेबाजी चालते, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी मांडल्या. त्याचबरोबर अन्य कार्यकर्ते बोलत असताना नवीन कार्यकर्ते मध्येच बाहेर निघून जात होते. त्यामुळे सुप्रिया संतप्त झाल्या.
 
राष्ट्रवादी भवनाला टाळे लावा
पक्षाच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवले जात नाही, अशी तक्रार काही कार्यकर्त्यांना केली होती. त्याचा समाचार घेताना सुप्रिया म्हणाल्या, कोणीही पक्षासाठी वेळ देत नाही, सर्वांना फक्त पदेच हवी आहेत.बोलावल्याशिवाय येणार नाही, असे राजेशाही उत्तर दिले जाते. संघटना असेल तरच सत्ता येईल, याचा सर्वांना विसर पडला आहे. कोणीही पक्ष कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे एवढे मोठे राष्ट्रवादी भवन हवे कशाला, याला टाळे ठोकले पाहिजे.
 
आंदोलन करताना उन लागते
लोकांमध्ये जाण्यात आपण कमी पडत असल्याचे सुप्रिया यांनी स्पष्ट केले. शेतकरी तुर प्रकरणात भरडला जात असताना आपल्यापैकी कोणीही शेतकऱ्यापर्यंत पोहचले नाही. आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी वेळ नाही. वेळ मिळाला तर आंदोलन करताना आपल्याला उन लागते. कपड्याची घडी बिघडते, कपडे खराब होतील म्हणून तुम्ही खाली बसू शकत नाही, अशा परिस्थितीत लोकांना हा पक्ष आपला कसा वाटणार? असा सवालही त्यांनी केला.
 
वजन कमी होणे चांगलेच
अनेक जणांनी मधल्या काळात पक्ष सोडल्याचे यावेळी सांगण्यात आले, त्यावर सुप्रिया म्हणाल्या, बरे झाले अनेक जण निघून गेले, अशांची आम्हाला गरजही नव्हती. राहिला विषय जे शरद पवार यांना सोडून गेले, त्यांचे पुढे काय झाले, हे सर्वांना माहिती आहे. बरे झाले पक्षाचे अतिरिक्त वजन कमी झाले. वजन कमी होणे आरोग्यासाठी चांगले असते, असे त्या उपहासाने म्हणाल्या.
 
एका महिन्यात गतवैभव येईल
कार्यकर्त्यांनी पक्षाला वेळ दिला,  आत्मचिंतन केले, निराशा दूर केली, जनतेसाठी २४ तास वेळ दिला तर आपला पक्ष एका महिन्यात गतवैभव प्राप्त होऊ शकते. त्यामुळे निराशा झटकून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि अजित पवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तोपर्यंत चित्र बदलून दाखवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
बातम्या आणखी आहेत...