आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या विरोधात न्यायालयातही जाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीसंदर्भात "खा, प्या, मजा करा' असे केलेले विधान महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे नाही. गडकरींच्या विधानासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

गडकरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली असल्याचे सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला धोका निर्माण झाला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चिखलफेक सुरू असल्यामुळे तिखट बोलावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी व्हावी असे वाटत होते; परंतु आता जनतेने गुणवत्तेच्या आधारावर कौल द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोदीशेठ यांचे लक्ष्य फक्त शरद पवार
सुळे म्हणाल्या, शरद पवारांकडे कुठलीही जबाबदारी नसताना, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयांशी त्यांचा संबंध नसताना मोदीशेठ त्यांना लक्ष्य बनवत त्यांच्यावर जहरी टीका करीत आहेत. देशाचे भवितव्य घडवणारे निर्णय सरकार बदलले तरी राष्ट्रवादी त्यासंबंधीची भूमिका बदलत नसल्याचे सांगून टोलसंबंधी राष्ट्रवादीची भूमिका कायम आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे टोलसंबंधी धोरणात्मक निर्णय घेता आला नाही. शिवसेना व भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येकी पन्नास टक्के खंडणी घेतली असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याबद्दल विचारणा केली असता खासदार सुळे म्हणाल्या की, मौलाना यांनी पडत्या काळात शरद पवार यांना साथ दिली. मौलाना यांना भेटून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

कंबरडे मोडले
राज्यात राष्ट्रवादीने रस्त्यांच्या क्षेत्रात चांगले काम केले. औरंगाबादच्या रस्त्यांवर आज कंबरडे मोडल्याचे सांगून महापालिका नीट चालवता येत नसलेले राज्य चालवायला निघाले, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून केली. पत्रकार परिषदेला आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, फुलंब्रीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण, नानासाहेब जाधव, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता चव्हाण, उरूज सिद्दिकी, नीलेश राऊत, संजय जाधव, किशोर चोटिया, औरंगाबाद पूर्वचे उमेदवार जुबेर मोतीवाला आदींची उपस्थिती होती.