आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरवसे खून खटला: 5 जणांना जन्मठेप; बीड जिल्हा-सत्र न्यायालयाचा निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- कुंभारी (ता. बीड) येथील माजी सरपंच उद्धव सुरवसे यांच्या राजकीय वैमनस्यातील खून प्रकरणात सोमवारी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अकरा जणांची निर्दोष मुक्तता केली.

बीड तालुक्यातील कुंभारी येथील उद्धव सुरवसे हे मोठे प्रस्थ होते. अनेक वर्षे ते गावचे सरपंच होते. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी विरोधी पॅनलचा पराभव करून ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती. याच राजकीय वैमनस्यातून २० मार्च २०१३ रोजी उद्धव सुरवसे व विनोद कवडे हे दुचाकीने (एमएच २३ व्ही ७०७७) बीडहून नेकनूरकडे जात असताना गवारी फाट्याजवळ कारने (एमएच १४, सीएक्स १७२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. यात उद्धव सुरवसे व विनोद कवडे खाली पडताच कारमधील दोन जणांनी उद्धव सुरवसे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या मानेवर, चेहऱ्यावर कत्तीने वार केले हाेते. इतर तिघांनी त्यांना मदत केली होती. 

दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेले विनोद कवडे यांनी आरोपींना पाहिले होते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी राजेंद्र ऊर्फ राजू मुरलीधर घिगे, विनोद मधुकर घिगे, तुुळशीराम ऊर्फ बप्पा अशोक विद्यागर, बाबू लिंबाजी काळे, सुधाकर ऊर्फ पिंटू भगवान भालेराव या हल्लेखोरांसह हा कट करणाऱ्या गावातील इतर ११ जणांवर नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे यांनी याप्रकरणी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. विद्वांस यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने एकूण ३४ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात  प्रत्यक्षदर्शी संदीप घल्लाळ, विनोद कवडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने इतर अकरा जणांना निर्दाेष ठरवत राजेंद्र घिगे, विनाेद घिगे, तुळशीराम विद्यागर, सुधाकर भालेराव, कारचालक बाबू लिंबाजी काळे या पाच जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बातम्या आणखी आहेत...