आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surekha Punekar In Aurangabad For Madhurima Club Function

तमाशाच्या फडाने संघर्ष शिकवला : सुरेखा पुणेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अश्लील नव्हे, लावणी तर महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे, पण या नृत्यकलेला जनमनाच्या हृदयस्थानी प्रतिष्ठापित करण्यासाठी काय संघर्ष करावा लागला आहे, हे कुणाला माहिती आहे का..? वडिलांच्या तमाशाच्या फडात नाचल्यामुळे ग्रामस्थ महिला जेवण देत नव्हत्या; पण विनवणी करत एक-दोन कुटुंबांकडून आलेल्या ‘माधुकरी’तून आमचा उदरनिर्वाह व्हायचा.
आता मात्र पंचतारांकित हॉटेलात जेवणाचा आग्रह धरला जातोय. ही भीषण संघर्षगाथा आहे, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची. मधुरिमा क्लबच्या वतीने आयोजित "नटरंगी नार' कार्यक्रमानिमित्ताने त्या शहरात नुकत्याच आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने बातचीत केली.
शिक्षण घेऊन चांगले करिअर करण्याची मनात इच्छा होती. मात्र, वडील कोंडिबा टाकळीकर यांचा तमाशाचा फड होता. वडिलांकडील कुणीही नातेवाईक तमाशात काम करत नव्हते. मात्र आई, आजी, मावशी, मावसबहीण आदी नातेवाइकांना तमाशात थिरकताना आपण पाहिलेले होते. शाळेत जाण्याची इच्छा होती, मात्र वडिलांनी तमाशाच्या फडातच खरी शाळा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे १९८६ पासून आपण लावणी सादर करण्यास सुरुवात केली. प्रारंभी पायदळी या गावाहून त्या गावी आम्ही जात होतो. त्यानंतर बैलगाडी, मग टेम्पोने महाराष्ट्र पालथा घातला. फक्त पुरुषच तमाशाला यायचे. ज्या गावी मुक्काम असायचा त्या गावात हॉटेल नसल्यामुळे ग्रामस्थांकडून ‘माधुकरी’ मागून जेवण आणले जात होते. घरातील गृहिणींचा मात्र जेवण देण्यास सक्त विरोध असायचा. त्यामुळे उपाशीपोटी लावणी सादर करण्याचेही अनेक वेळा प्रसंग ओढवल्याचे शल्य सुरेखा यांनी मुलाखतीतून बोलून दाखवले.
१९९८ पर्यंत "नटरंगी नार' बदनामच होती. त्यामुळे महिलांच्या मनातील लावणीविषयी असलेली अश्लीलता काढण्याचा आपण निश्चय केला होता. त्याचाच एक भाग म्हणून जून १९९८ मध्ये तमाशाच्या फडातून लावणी बाहेर काढून पहिल्यांदा मुंबईच्या थिएटरमध्ये आपण आणली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील सादरीकरणानंतर हळूहळू पुण्याच्या ‘बालगंधर्व नाट्यगृहात’ ढोलकीची थाप अन् लावणीचे स्वर गुंजले. त्यानंतर महिलांसाठी पहिल्यांदा "नटरंगी नार' अभिजनवर्गाच्या पुण्यातील ‘बालगंधर्व’मध्येच आपण सादर केली. त्या वेळी १५ हजार रुपयांचे बुकिंग झाले होते. त्यानंतर आपण कधीही मागे वळून पाहिले नसल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शिवाय आता तर लावणी सातासमुद्रापार म्हणजेच अमेरिकेच्या मॅडिसन चौकातही सादर करण्याचा आपल्याला आनंद आहे.
लावणीच्या १५०० प्रयोगांतून शाळांना मदत
लावणीअश्लील नसल्याचे महिलांना आता पटले आहे. लावणीचे आतापर्यंत साडेसात हजार प्रयोग झाले असून त्यापैकी शाळांच्या आर्थिक मदतीसाठी १५०० प्रयोग केले आहेत. मंदिराच्या जीर्णोधारासाठी हजार प्रयोग केले आहेत. ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून जवळपास हजार प्रयोग केले आहेत. त्यातून अंध-अपंगांना मदत, तर झालीच, शिवाय रुग्णवाहिकाही रस्त्यावर धावत आहेत. महिलांसाठी ६०० प्रयोग झाल्याचे त्यांनी म्हटले.