आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धविहारांना शिल्पकला ‘धम्मदान’ करणारा कलावंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बौद्ध तत्त्वज्ञानात ‘धम्मदान’ अनिवार्य आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, त्यांना सूट असली तरीही सच्चा बौद्ध अनुयायी दान दिल्याशिवाय राहत नाही. तथागताची मूर्ती घडवण्याची जन्मजात कला अवगत असलेल्या सुरेश खंडेराव या शिल्पकाराने तर वयाच्या दहा वर्षांपासून शिल्पकलेचेच ‘धम्मदान’ देण्याचे व्रत अंगीकारलेले आहे. रामनगरच्या धम्मसागर बुद्धविहारातील भदंत जयंतो बोधी यांनी उपासकांच्या मदतीने मूर्ती नसलेल्या विहारांना शंभर मूर्ती ‘धम्मदान’ म्हणून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.!

बुलडाण्यातील पळसी गावाचे खंडेराव यांनी इयत्ता चौथीत असताना सर्वप्रथम मातीच्या मूर्तींना आकार दिला. त्या वेळी शिल्पकलेचे कुठलेही प्रशिक्षण नसताना शेतातील मातीच्या मूर्ती तयार करण्याचा छंद त्यांना जडला. वर्षभरानेच त्यांनी आकर्षक सिमेंटची 25 फूट बुद्धमूर्ती तयार करून गावातील विहाराला ‘धम्मदान’ केली. घरची परिस्थिती बेताचीच असली तरी त्यांनी मोबदला स्वीकारला नाही. तेव्हापासून त्यांचे धम्मदान म्हणून बुद्धमूर्ती देण्याची चळवळ अविरत सुरूच आहे. रामनगर येथील बुद्धविहाराला साडेसात फुटी मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. खंडेराव यांनी शिल्पकलेचे शास्त्रीय शिक्षण मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये घेतले. 40 वर्षांत त्यांनी 49 भव्य बुद्धमूर्ती तयार केल्या असून देश-विदेशातील विहारांना धम्मदान दिल्या आहेत. 49 पैकी 24 मृर्ती भारताबाहेरील बौद्धराष्ट्रांत दिल्या आहेत.

अमिताभचेही मन जिंकले
अमिताभ बच्च्नने स्वत:चे शिल्प साकारण्यासाठी 2012 मध्ये राज्यातील नामवंत शिल्पकारांना आपल्या निवासस्थानी बोलावून ‘ऑडिशन’ घेतली. 12 शिल्पकारांनी यात भाग घेऊन ‘क्ले’ बनवला. त्या वेळी 12 शिल्पकारांपैकी खंडेराव यांनी तयार केलेली मूर्तीच महानायकाच्या पसंतीस उतरली. अमिताभ यांनी त्यांचा ‘क्ले’ लंडनच्या संग्रहालयास पाठवला आहे.

सर्व बौद्ध राष्ट्रांना भारतानेच मूर्ती द्याव्यात
गौतम बुद्धांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी भारतातूनच केला. जगातली राष्ट्रे बौद्धविचाराचा स्वीकार करताहेत. तेथील विहारात मात्र तेथील बुद्धचेहर्‍याच्या मूर्ती बसवतात. त्याऐवजी भारतीय चेहर्‍याच्याच मूर्ती सर्वांनी प्रतिष्ठापित कराव्यात. - सुरेश खंडेराव, शिल्पकार

18 ऑक्टोबरला शंभर मूर्तींचे उद्दिष्ट होईल पूर्ण
धम्मसागर विहाराचे सुजित फुलवरे, अनिल निकाळजे, अनिल म्हस्के, विशाल निकाळजे, जनार्दन मोकळे, कमल चक्रे, वसंत हिवराळे आणि रतन जाधव आदी उपासकांनी स्वत:चे दान देऊन इतर दानशूरांनाही या उपक्रमात सहभागी केले. वर्षावास संपल्यानंतर 18 ऑक्टोबरपर्यंत शंभर मूर्तींचे उदिष्ट पूर्ण होईल. एका मूर्तीला एक लाख रुपये खर्च येईल. भन्ते जयंतो बोधी, अध्यक्ष, बीईआरएसर