आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजार्‍याचा महापालिकेत आत्महत्येचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वेदांतनगर येथील महादेव मंदिराच्या इमारतीतील एक गाळा माझ्या नावे केला नाही तर इमारत पाडून टाकीन, अशी धमकी स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनी दिल्याचा आरोप करत एका पुजार्‍याने महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, तर 40 मीटरच्या रस्त्यावर होणारे बांधकाम पाडण्याचे आदेश देणे चुकीचे आहे का, असा सवाल जैन यांनी केला.

विनोद वामनराव वाघमारे असे या पुजार्‍याचे नाव असून तो पालिकेत कर्मचारी होता. त्याला कामावरून कमी करण्यात आले आहे. उपायुक्त रवींद्र निकम यांनी दुपारी मंदिराची पाहणी केल्याचे समजताच तो त्यांच्या दालनात आला. त्याने आरडाओरड केली. बांधकाम अनधिकृत असल्यामुळे पाडावे लागणार, असे निकम यांनी सांगताच बाहेर येऊन उडी घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्याला रोखले.

छोटे मंदिर, मोठे बांधकाम : रेल्वेस्थानक ते औद्योगिक वसाहत या रस्त्यावर पूर्वीच्या फूड लव्हर्स या हॉटेलच्या जागेवर एक मूर्ती बसवण्यात आली. त्याच्या बाजूला हे दुमजली बांधकाम करण्यात आले. या परिसराचे क्षेत्र 2 एकर 8 गुंठे असल्याचे वाघमारे यांचे म्हणणे आहे, तर ही जागा औद्योगिक वसाहतीची आहे. त्यावर झालेले अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई करण्याची सूचना प्रशासकीय अधिकार्‍याला दिल्याचे जैन यांनी सांगितले.

वाघमारे यांचा आरोप : गेल्या 100 वर्षांपासून जागेचा ताबा वाघमारे आणि त्यांच्या पूर्वजांकडे आहे. तेथे धर्मशाळा होती आणि आता त्याची दुरुस्ती करण्यात आली. नवीन बांधकाम केलेले नाही. जैन यांना या बांधकामातील एक गाळा हवा होता. यासाठी त्यांनी संपर्क साधला. हॉटेल विट्स येथे एक मीटिंगही झाली. मात्र वाघमारे यांनी नकार दिला. गाळा दिला नाही तर सर्वच बांधकाम पाडले जाईल, असा निरोप उपायुक्त निकम यांच्यामार्फत देण्यात आला. एक गाळा द्या अन्यथा सर्वच इमारत पाडली जाईल, अशीही धमकी होती.

निकम म्हणतात, राजीनामा देईन : वैध बांधकाम असल्याने ते पाहण्यासाठी गेलो होतो. मी त्याला धमकी दिल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईल, असे निकम यांनी सांगितले.
मंदिराच्या धर्मशाळेत एक गाळा पाडून तो जैन यांना द्यावा, त्याचा रीतसर करार करून द्यावा अन्यथा सर्वच बांधकाम पाडले जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. मी बधलो नाही म्हणून पाडण्याची भाषा सुरू केली. कोणीच मला न्याय देत नाही म्हणून मी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. मंदिराची जागा मी कोणालाही देणार नाही. विनोद वाघमारे, पुजारी.
औद्योगिक वसाहतीच्या जागेवर हे मंदिर झाले आहे. बाजूला व्यावसायिक बांधकाम झाले. अवैध बांधकाम पाडण्यात यावे, असे आदेश तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी दिले होते. मी तेथेच राहतो. तेथे पूर्वी मंदिर नव्हते. त्यामुळे कारवाई करण्याचे सांगितले होते. अवैध बांधकाम रोखण्याचे आदेश दिल्याने माझ्यावरच ते आरोप करत आहेत. विकास जैन, सभापती स्थायी समिती.