आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी होण्यापूर्वीच मनपाचे निलंबित तीन अधिकारी रुजू, शिवसेनेच्या गोटात संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजपचे बडे नेते, एक माजी पदाधिकारी, एका आमदाराने केलेल्या वाटाघाटीचे मनपातील बड्या अधिकाऱ्यांना “फळ’ मिळाले. गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. भागवत नाईकवाडे, शाखा अभियंता आर. एम. वाघमारे यांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच शुक्रवारी (१८ आॅगस्ट) कामावर रुजू करून घेण्यात आले. भ्रष्ट अधिकाऱ्यांना कामावर घेऊ नका, असे पालकमंत्री रामदास कदम यांनी १५ आॅगस्ट रोजी थेट आदेश दिले होते. गेल्या आठवड्यापर्यंत आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही चौकशीतून सत्य समोर आल्यावरच निलंबन मागे घेतले जाऊ शकते, असे गेल्या आठवड्यात म्हटले होते. प्रत्यक्षात उलटे घडले. यामुळे शिवसेनेच्या गोटात संताप व्यक्त होत असून यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पानझडे ८, नाईकवाडे, वाघमारे १३ महिने ७५ टक्के पगार घेऊन कामावर परत आले आहेत. विभागीय चौकशीच्या अंतिम निर्णयास अधीन राहून हा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या नेत्याने आयुक्तांना बंगल्यावर बोलावून घेतले अन् सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजे १७ आॅगस्ट रोजी रात्री वाजता आयुक्तांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश काढले. मात्र, आदेशावर १६ ऑगस्ट अशी तारीख टाकण्यात आली. शुक्रवारी सकाळी पानझडे कार्यालयात आले तेव्हा आपल्याला चकवा मिळाल्याचे अन्य पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. 

डाॅ.कुलकर्णींचाही निर्णय होऊ शकतो
तत्कालीनआयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पानझडे, नाईकवाडे, वाघमारेंसोबत नगररचना सहायक संचालक डॉ. दीपक कुलकर्णी, अग्निशमन विभागप्रमुख शिवाजी झनझन, उपअभियंता शिरीष रामटेके यांनाही निलंबित केले होते. झनझन, रामटेके निलंबन कालावधीतच निवृत्त झाले. आता डॉ. कुलकर्णी यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णयही होऊ शकतो. 

स्थायीसमितीचे अधिकार दाखवून देतो- बारवाल : महापौरभगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी निलंबन रद्दचा आदेश कसा निघाला, याची माहिती नसल्याचा दावा केला. हा प्रशासकीय निर्णय असल्याचे सांगून महापौरांनी बोलणे टाळले. मात्र, बारवाल म्हणाले की, आता २३ आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत स्थायी समितीचे अधिकार काय असतात ते दाखवून देतो. निलंबित अधिकाऱ्यांना कामावर घेऊन त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. परंतु तेव्हा आयुक्तांनी जुमानले नाही. तेव्हा आताच असे नेमके काय घडले की या अधिकाऱ्यांना कामावर घ्यावे लागले, असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे बारवाल यांनी संपर्क साधल्यावर वेळ देऊनही त्यांची भेट घेणे आयुक्तांनी टाळले. 

चर्चा अशी
मनपातील भाजपचा पदाधिकारी, माजी पदाधिकारी, दुसऱ्या जिल्ह्यातील भाजपचा एक आमदार आणि भाजपच्या एका बड्या नेत्यानेच अधिकाऱ्यांसाठी वाटाघाटी केल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. 

संजय पवार म्हणाले, मला रुजू करून घ्या 
लेखाधिकारी संजय पवार यांना १४ फेब्रुवारी २०१७ रोजी निलंबित करण्यात आले. त्याला सहा महिने पूर्ण झाले. नियमानुसार निलंबित अधिकाऱ्याची चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करून निर्णय घ्यायला हवा. त्याचे पालन झाले नसल्याने मलाही कामावर घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले. मात्र, अजून चौकशी पूर्ण झालेली नाही, तेव्हा रुजू करून घेणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

१०० कोटींच्या विल्हेवाटीसाठी 
दरम्यान, आयुक्तांनी राजकीय दबावातून हा निर्णय घेतला असून यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी केला. १०० कोटींच्या रस्ता कामांची विल्हेवाट लावण्यासाठीच पानझडेंना कामावर घेण्यात आले. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत जाब विचारू, असेही ते म्हणाले. 

वाटाघाटींमागे दानवे की फडणवीस, शोध घेऊ 
भ्रष्ट अधिकाऱ्यांनापुन्हा कामावर घेण्याच्या वाटाघाटींमागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा शोध मी घेणार आहे. 

पानझडेंचे आर्थिक अधिकार काढले 
निलंबन रद्द करण्याच्या आदेशात पानझडेंना अंदाजपत्रके बिलांच्या मंजुरीचे अधिकार राहणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यांना फक्त आयुक्तांकडे शिफारस करता येईल. 

कशामुळे, किती काळ निलंबित 
एस.डी. पानझडे : सप्टेंबर २०१६- हर्सूल तलावातील गाळ काढणे, टीव्ही सेंटर ते जळगाव रोडच्या निविदेत अनियमितता- ११ महिने १० दिवस 
डॉ.भागवत नाईकवाडे : २७ मार्च २०१६- प्राणिसंग्रहालयात वाघांच्या बछड्यांचा मृत्यू- १६ महिने २० दिवस 
आर.एम.वाघमारे : १८ एप्रिल २०१६- चुकीचा टीडीआर लोड केला- १६ महिने 
बातम्या आणखी आहेत...