आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्‍ये पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू, खिशात सापडली तीन पानी चिठ्ठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- बालानगर येथील पत्रकार शेख मुकरम बद्रुद्दीन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिस  या प्रकरणाच्या कसून तपासात गुंतले आहे. दरम्यान, मुकरम यांचा काही वर्षांपासून शेतीचा वाद सुरू होता. त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे.   त्यांच्या खिशात तीन पानी चिठ्ठी सापडली आहे. त्यात आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे.  
 
दरम्यान नातेवाईकांनी जो पर्यंत दोषींना अटक करत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. बालानगर (ता. पैठण) येथील पत्रकार शेख मुकरम बद्रुद्दीन (४०) यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील एका चिंचेच्या झाडाला लटकलेला गावातील नागरिकांना बुधवारी आढळून आला.  नेमकी ही आत्महत्या आहे की घातपात, याविषयीची चर्चा संपूर्ण गावासह दिवसभर पैठण तालुक्यात सुरू होती.  
 
बालानगर परिसरातील मनमिळाऊ व सर्वसामान्यांच्या झालेल्या अन्यायावर सतत आपल्या लिखाणातून आवाज उठवणारे व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ पत्रकार शेख मुकरम म्हणून ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वी शेख मुकरम यांच्या भावाला गावातील त्यांचाच चुलत भाऊ व पुतण्या यांनी गंभीर मारहाण करून जखमी केले होते.  त्यात त्यांच्या भावावर औरंगाबाद येथील दवाखान्यात आजपर्यंत उपचार सुरू आहेत. मंगळवारू रात्री शेख मुकरम हे जेवण करून घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यामुळे त्यांचा इतरत्र शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. सकाळपर्यंत घरी येतील, या आशेने कुटुंबीय घरी वाट बघत होते. परंतु सकाळी आठच्या सुमारास गट नंबर १७१ मध्ये चिंचेच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेला दिसून आला. त्यांच्या मृत्यूची बातमी तालुक्यात पसरली.

तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता मृत शेख मुकरम यांच्या खिशात एक तीन पानांची  चिठ्ठी सापडली. त्यामध्ये दोन पाने हिंदीत, तर एक पान मराठीत लिहिलेले आहे. परंतु नातेवाइकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. कुणाच्या तणावाखाली आत्महत्या केली, त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करत नातेवाइकांनी शवविच्छेदन व दफनविधी करण्यास विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड व सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी नातेवाइकांची समजूत घालून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी सहा वाजता बालानगर येथील कब्रस्तानामध्ये  दफनविधी करण्यात  आला.
 
एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल  राठोड, सहायक पोलिस निरीक्षक  ज्ञानेश्वर  पायघन, बीट जमादार जाकेर शेख, रामेश्वर तळपे, विजय पवार, मुस्ताक सय्यद, रणजित वानोळे करत आहेत.
 
कर्ज माफीचा लाभ मिळणे अशक्य, पत्रकाराने नाथांच्या नावाने दुसऱ्या दिंडीला विरोधमृत्यूला कवटाळले ?
मुकरम शेख यांनी आपल्या तीन पानी चिठ्ठीत आपण जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे, माझ्यावर सन २००९ साली काही कर्ज होते,आज जरी सरकार ने कर्ज माफी केली असली तरी त्याचा लाभ जाचक अटीमुळे आमच्या पर्यंत होईल असे दिसत नाही. आज समाजाची मानसिकता बदलत आहे, माणसाला माणूस पण राहिले नाही, काही लोकांचे माझ्यावर कर्ज होते मात्र त्यांचे नाव मी घेऊ इच्छित नाही माझ्यामुळे त्यांना अडचण येता कामा नाही असा उल्लेख मुकरम शेख यांनी तीन पाणाच्या चिठ्ठीत केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. मात्र, ही चिठ्ठी माध्यमांना देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...