आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाचा संशयास्पद मृत्यू? पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - न्यूइंदिरानगर येथील रहिवासी रिक्षाचालक सय्यद सिराज सय्यद अय्युब (३५) याचा बुधवारी पहाटे संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास किराणा चावडी येथे सय्यद हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे सहाच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सिराजचा खून करण्यात आल्याचे त्याच्या नातेवाइकांनी म्हटले आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक धर्मराज देशमुख पुढील तपास करीत आहेत.
जुना किराणा चावडी येथे सिराज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा फोन पोलिसांना आला होता. त्यानुसार सिटी चौक पोलिस ठाण्याची मोबाइल व्हॅन तत्काळ तेथे पोहोचली. सिराज याला घाटीत दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
नातेवाइकांचेम्हणणे अपघात नव्हे खून : सिराजयाचा भाऊ सय्यद अब्दुल हमीद आणि मेहुण्याच्या मते हा अपघात नसून खून असून चार ते पाच लोकांनी रात्री त्याला मारहाण केली. मात्र पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार किराणा चावडी येथे तो बेशुद्धावस्थेत सापडला. मात्र, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, तो वसंत भुवन येथे बेशुद्ध पडला होता. आम्हाला पोलिस ज्या व्यक्तीने फोन केला त्याचा नंबरही देत नाहीत, असे सिराज यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. घाटीतही योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या संबंधात आम्ही पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सिराजच्या नातेवाइकांनी सांगितले. याबाबत पोलिस उपनिरीक्षक देशमुख यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

खुनाचे चित्रीकरण पोलिसांकडे
सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार या मारहाणीची क्लिप काही बघ्यांनी तयार केली असून पोलिस त्यानुसार तपास करत आहेत. चौघांनी मिळून सिराज यास मारहाण केल्याची माहिती समोर आली असून त्याची क्लिप पोलिसांपर्यंत पोहोचली असून त्यानुसार आरोपींची नावे समोर येतील, असे सूत्रांनी सांगितले.