जळगाव- कानळद्यात मंगळवारी मरिअाईच्या यात्रेनिमित्त आलेला तमाशा बघण्यासाठी रात्री ९ वाजात गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा बुधवारी सकाळी ७ वाजात गावाबाहेरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. जमिनीच्या वादातून चुलत भावासह दोघांनी त्याचा खून करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप त्याच्या अाजोबांनी केला आहे.
कानळदा येथील प्रशांत श्यामकिरण सपकाळे (वय १९) या तरुणाला मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कुणाचा तरी फोन आला होता. गावात मरिआईची यात्रा होती. या यात्रेनिमित्त गावात तमाशा आलेला होता. तो तमाशा बघण्यासाठी गेलेला होता. मध्यरात्र झाली तरी तो घरी परतला नाही. तो मालवाहू रिक्षा चालवतो. कदाचित रिक्षा घेऊन गेलेला असावा, असे अाजोबा रामचंद्र देवचंद सपकाळे यांना वाटले. तो रात्रभर घरी परतलाच नाही. मात्र, सकाळी ७ वाजेच्या सुमारास कानळद्यातील वामन दावजी सोनवणे हे गावाबाहेर जात होते. त्यांना हॉटेल उत्कर्षपासून शंभर मीटरारावर असलेल्या लिंबाच्या झाडाला प्रशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तातडीने याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा आणला. प्रशांतचे वडील श्यामकिरण सपकाळे हे नेरुळ येथे सेंट्रिंगचे काम करतात. ते सकाळीच जळगावला येण्यासाठी निघाले होते.
कानळद्यातील वडिलोपार्जित ५० आर शेतजमिनीवरून सपकाळे कुटुंबीयांमध्ये काही वर्षांपासून वाद सुरू आहे. या जमिनीबाबत महसूल यंत्रणेने सातबारावर चुकीची नोंद केल्याबद्दल न्यायालयात खटला सुरू आहे. प्रशांतचे चुलत काका जगन्नाथ लक्ष्मण सपकाळे यांच्या नावावर ही जमीन आहे. त्यांचा मुलगा सुधीर ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने मला, माझ्या पत्नीला प्रशांतला मारहाण केली होती. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या सांगण्यावरून नामदेव बिऱ्हाडे शुभम बिऱ्हाडे यांनी माझ्या पत्नीला मारहाण केली होती. या सर्वांकडून जीविताला धोका असल्याबाबत तालुका पोलिसात अर्ज दिला होता. एसपी कार्यालयातही निवेदने दिली अाहे. सुधीरने नामदेव बिऱ्हाडेंसोबत जमीन विक्रीसाठी सौदाही केला आहे. या सर्वांनी मिळून प्रशांतचा खून केला आहे, असा आरोप, प्रशांतचे अाजोबा रामचंद्र सपकाळे यांनी केला. प्रशांतच्या छातीवर, हातावर नाकावर खरचटलेले आहे. दरम्यान, वादग्रस्त जमिनीच्या दिवाणी दाव्याबाबत ३ ऑगस्ट रोजी न्यायालयात कामकाज होणार आहे.