आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईग्रस्त १५० गावांना शाश्वत विकासाचा मंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने त्यांनी २० वर्षांपूर्वी जिल्ह्यात पाऊल ठेवले. पैठण तालुक्यातील वडजी गावात पाणलोट क्षेत्राचे काम केले आणि गावातल्या विहिरींना पाणी आले. शेतकऱ्यांनीच गाडी अडवून तुमच्या कामामुळे काय चमत्कार घडला हे पाहण्यासाठी थांबवले. तो प्रसंग आयुष्याला वळण देणारा होता. प्रत्येक अडचण दूर करत १५० गावांना टंचाईमुक्त करणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे ग्रामविकास संस्थेचे प्रमुख नरहरी शिवपुरे.
मूळ उदगीर येथील शिवपुरे १९९२ ला औरंगाबादेत आले. मार्केटिंग, शिकवणी घेणे अशी कामे केल्यानंतर बाबा भांड यांच्या साकेत प्रकाशनात नोकरी केली. त्यांच्यासोबत वडजी पाणलोट क्षेत्र विकासाचे काम सुरू केले याच क्षेत्रात आयुष्यभर काम करण्याचे ठरवले.

आयुष्याची दिशा : वडजी आणि आजूबाजूच्या दहा गावांत १९९५ ते २००० अशी पाच वर्षे पाणलोट क्षेत्राचे काम वयाच्या २५ वर्षी केले. या वेळी गावात जाताना एका गावच्या शेतकऱ्यांनी गाडी अडवत केलेल्या कामामुळे विहिरीला पाणी कसे आले हे दाखवले. तुम्ही केलेल्या कामाचे हे फळ आम्हाला मिळाले. हीच किमया सर्वत्र करा, असे सांगितले. आजही दुष्काळात वडजी गाव दुष्काळाला पुरून उरले असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे फळबागांचे उत्पन्न घेते. याच वेळी पुण्यातल्या सोस्वा संस्थेचे शिबिर झाले. त्यानंतर संस्था स्थापनेचा निर्णय घेतला. योजनांच्या माध्यमातून १५० गावांत शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून गावांचे अर्थकारणदेखील बदलले आहे.

नदी पुनरुज्जीवनाचा मार्ग : सिंदोनमध्येचित्ते नदीचे काम करताना अनेक ग्रामस्थ आमच्या बाजूने उभे राहिले. १६ पैकी १० किमी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण पूर्ण झाले असून उर्वरित सात किमींचे काम सुरू आहे. यामुळे १६ गावांचे अर्थकारण बदलणार आहे. आता बेंबळा नदीच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात केली आहे.

प्राधान्यक्रम ठरवून कामे
शिवपुरे सांगतात की, गावाच्या संमतीशिवाय काम अशक्य असल्याने ग्रामसभेत कामाचा आराखडा सादर करतो. कोणती कामे बिनापैशाने होतात, कोणती लोकसहभागातून होतात याची यादी जाहीर करतो. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवतो.