आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 वर्षांनंतर आमच्याशी गाठ आहे, फसवणे सोपे नाही, स्वा. शे.संघटनेचा सरकारला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आम्हाला सत्ता महत्त्वाची नाही, पण तो आमचा हक्क आहे, दिलेले आश्वासन पाळले गेले पाहिजे, आतापर्यंत एकच लाल दिवा दिला. पुढे काहीही चर्चा नाही, आमच्यामुळे सरकार आहे, याचे भान जाता कामा नये, आम्ही संयमी आहोत, म्हणून शांत आहोत, आम्हाला फसवणे सोपे नाही, सरकारने कायम लक्षात ठेवावे की पुन्हा पाच वर्षांनी आमच्याशी गाठ आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युतीच्या सरकारला इशारा दिला.

अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत सरकारला हा इशारा दिला. ही संघटना निवडणुकीपूर्वीच युतीत दाखल झाली होती. घटक पक्ष या नात्याने त्यांनी निवडणूक लढवली. सहा महिन्यांनंतर त्यांच्या वाट्याला एक महामंडळ देण्यात आले. प्रत्यक्षात चर्चा होती ती एका कॅबिनेट मंत्रिपदाची, पण ते अजून तरी शक्य झाले नाही. जून महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पत्रकारांनी छेडले असता खा. शेट्टी म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि त्यात कोणाला स्थान मिळणार, यावर आम्ही बोलणे योग्य नाही. मुख्यमंत्री किंवा त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यावर बोलू शकतात, पण आम्हाला फसवणे सोपे नाही, याचे भान त्यांनी ठेवावे. सत्ता ही आमच्यासाठी साधन आहे, साध्य नव्हे.
सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी व्हायला हवा. निवडणुकीत आम्ही केलेली मदत लक्षात घेता तो आमचा हक्क आहे. आम्ही संयमी आहोत अन् स्वाभिमानीही आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.
आंदोलन करणारच
ऊस,दुधाचे दर यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करणारच, सरकारमध्ये असलो म्हणून त्यात काहीही फरक पडणार नाही, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. आमच्या सत्तेचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला हवा. त्यासाठी आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी सांगितले. येत्या जूनला नाशिक येथे आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर ते राज्यभर होईल, असेही शेट्टी यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...