आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात मार्चअखेर आठ लाख शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रत्येक गावांनी दुर्गंधी आणि रोगराईमुक्त व्हावे यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून गावस्तरावर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभरात ३१ मार्च २०१६ पर्यंत ७ लाख ९९ हजार २४० कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. यात मराठवाड्यातील १ लाख ७१ हजार ८७ शौचालयांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक शौचालयाचे बांधकाम करण्यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे, तर सर्वात कमी शौचालयाचे बांधकाम केल्याने हिंगोली जिल्हा स्वच्छ भारत मिशनमध्ये पिछाडीवर पडला आहे, तर नांदेड जिल्हा मराठवाड्यातून अव्वल तर औरंगाबाद जिल्हा शौचालय बांधणीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यातील प्रत्येक वाडी, वस्त्या, तांडे आणि गाव हागणदारीमुक्त व्हावे, गावस्तरावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा, यासाठी प्रत्येक लाभार्थीना शौचालय बांधण्यासाठी स्थानिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या माध्यमातून १२ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ शौचालय बांधण्यात पुढाकार घेत गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे हे मिशनही गावाच्या हितासाठी फलदायी ठरल्याचे दिसत आहे. यामुळे प्रत्येक गाव आता हागणदारीमुक्त होणार आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्र सुजल महाराष्ट्र-निर्मल महाराष्ट्र झाल्याचे दिसून येईल.

राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ला गावस्तरावर ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे २०१५-१६ या वर्षात मार्च २०१६ अखेर रत्नागिरी ४२०८६, नाशिक ३५८८१, यवतमाळ ३४५३१, कोल्हापूर ३३७९५, सोलापूर ३०६२६, पुणे २९५८८, जळगाव २७७६३, धुळे २७५३७, नंदूरबार २६१६६, बुलडाणा २५०७५, अकोला २४७५२, चंद्रपूर २४१०६, नागपूर २३८६८, वाशीम २२३४०, अमरावती २१०८२, वर्धा २०६५६, सांगली १९४०६, सातारा १९०१४, गोंदिया १८०५३, ठाणे १६००९, रायगड १३०३५, भंडारा १२४०९, पालघर ११५३९, गडचिरोली ९३३८, सिंधुदुर्ग ७९६२ यासह ३४ जिल्ह्यांमध्ये ७ लाख ९९ हजार २४० कुटुंबांनी प्रोत्साहनपर अनुदान घेत शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे ८ लाख कुटुंबांचे वर्षभरात शौचालयाला उघड्यावर जाण्याचे थांबले आहे. विशेषत: राज्यात सर्वंाधिक अहमदनर जिल्ह्यात ५१,५६१ शौचालयांचे बांधकाम झाल्याने पहिल्या क्रमांकावर आहे, तर नांदेड जिल्ह्यांत ३५,८८१ शौचालये बांधण्यात आल्याने तो राज्यात तिसऱ्या स्थानी आहे.

मराठवाड्यात नांदेड अव्वल
मराठवाड्यात शौचालय बांधणीत नांदेड जिल्ह्याने आघाडी घेत ३१ मार्चअखेर ३५,८८१ शौचालयाचे काम पूर्ण करत मराठवाड्यातून अव्वल स्थान पटकावले आहे. हिंगोली जिल्ह्यांत सर्वांत कमी केवळ ७ हजार ७७५ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे हा जिल्हा शौचालय बांधणीत मागे पडल्याचे पाहावयास मिळत आहे. तर बीड जिल्ह्यांनी ३१ हजार २५२ शौचालयाचे काम करत दुसऱ्या स्थानी राहण्याचे सातत्य ठेवले आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यांतही २३ हजार ४४१ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच जालना २१ हजार ३०५, लातूर १८ हजार ७१७ व परभणी जिल्ह्यांत १५ हजार ३९०, असे संपूर्ण मराठवाड्यात १ लाख ७१ हजार ८७ शौचालयाचे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मराठवाडाही आता हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांनो, शौचालय बांधणीसाठी पुढाकार घ्या
^
औरंगाबाद जिल्ह्यांत ४७,३४५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. परंतु आतापर्यंत २३ हजार ४४१ शौचालयाचे गावस्तरावर बांधकाम करण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आता १५ एप्रिलपर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्दिष्टापर्यंत पोहोचू. प्रत्येक गावाने शौचालय बांधणीसाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी शासनाकडून प्रोत्साहनपर १२ हजारांचे अनुदान देण्यात येईल.
- अजय जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.औरंगाबाद.

मराठवाड्याची पूर्ण शौचालय स्थिती
नांदेड ३५,८८१
बीड ३१,२५२
औरंगाबाद २३,४४१
जालना २१,३०५
लातूर १८,७१७
उस्मानाबाद १७,३२६
परभणी १५,३९०
हिंगोली ७,७७५