आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swapnil Kadam Death In Accident At Aurangabad, Aurangabad

स्वप्निल कदमचे उद्योजक, होण्याचे स्वप्न राहीले अधुरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्लास्टिक टाक्या बनवण्याचा उद्योग उभारण्याचे स्वप्न उंबरठ्यावर असताना स्वप्निल कदम (२७, संगीता कॉलनी) याचा सुरत येथील अपघातात गुरुवारी (१८ सप्टेंबर) मृत्यू झाला. रिपाइंचे (ए) प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांचा तो ज्येष्ठ चिरंजीव होता. पाचोड रोडवरील काद्राबादच्या (कचनेर) कारखान्यासाठी यंत्र खरेदीकरिता स्वप्निल आपल्या मित्रांसह अहमदाबादला जात होता. वाळूजचे उद्योजक अरविंद पंडित यांच्यासह चौघांचा मृतांत समावेश आहे. अपघातामुळे स्वप्निलचे उद्योजक होण्याचे स्वप्न भंगले, तर अरविंदच्या रूपाचे नवउद्योजक गमावल्याची भावना शहरातून व्यक्त होत आहे.

वडिलांनी स्थापन केलेल्या नालंदा शिक्षण संस्थेत तो सचिव होता. देवगिरी महाविद्यालययातून शिक्षण घेतल्यानंतर तो इतिहासात एमए करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडीचे संशोधनही करत होता. उद्योजक व्हायचे असल्याने त्याने राजगीर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. काद्राबाद येथे त्याने कारखानाही उभारला. १७ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता यंत्रे खरेदीसाठी तो आपल्या मित्रांसह टाटा सफारीने अहमदाबादला निघाला होता. वाळूज येथील हर्ष मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा वसुंधरा कॉलनीतील रहिवासी अरविंद जनार्दन पंडित यांनी प्लास्टिक टाक्यांचा प्रकल्प सुरू केला होता. त्यांच्याच ओळखीने यंत्रे खरेदी करण्यासाठी स्वप्निल अहमदाबादला जात होता. मित्रांनाही त्याने सोबत घेतले. मात्र, नियतीला स्वप्निलचे उद्योजक होण्याचे स्वप्न मान्य नव्हते. सुरत जिल्ह्यातील पलसाना तालुक्याच्या कडोदरा गावात गुरुवारी पहाटे ३.३० वाजता भीषण अपघात झाला. टाटा सफारी कार (एमएच २० बीव्ही ५५९९ ) पाठीमागून एका ट्रकमध्ये घुसली. चालक अनिल नाथाजी कांबळेचे (३५, काचीवाडा) नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे कडोदरा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उद्योगाकरिता यंत्रे खरेदी करण्यासाठी मित्रांसोबत जाताना भीषण अपघात
स्वप्निलसह चौघांचे पार्थिव बाबूराव कदम, मिलिंद शेळके यांनी शहरात आणले आहेत. स्वप्निल, अरविंद यांच्यावर भीमनगर स्मशानभूमीत शुक्रवारी (१९ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याचे शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी कळवले आहे, तर कांबळेवर पुष्पनगरी येथे अंत्यसंस्कार होतील.
मृत्यूच्या दाढेतून "तो' परतला
अपघातातूनस्वप्निलचा मित्र सचिन घोडेराव (२५, कोटला कॉलनी) हा बालंबाल बचावला. त्याच्यावर सुरत येथील न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्वप्निलसह अरविंद पंडित (४५, वसंुुधरा कॉलनी), चालक अनिल कांबळे, जनार्दन वामन ससाणे (३१, पडेगाव) यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अनिलची पत्नी गृहिणी असून ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना वर्षांच्या मुली आहेत. अरविंद यांचा एक मुलगा १४ वर्षांचा, तर दुसरा १० वर्षांचा असून पत्नी गृहिणी आहे.
‘ते’ तीन तास..
कडोदरायेथील मोदी हॉस्पिटलच्या समोर हा अपघात झाला. त्यानंतर हाकेच्या अंतरावरील ठाण्यातील पोलिस तेथे धावले. तांदळाने भरलेल्या कंटेनरच्या मागील बाजूच्या दोन्ही चाकांमध्ये टाटा सफारी घुसली. पोलिसांनी पहाटे साडेतीन ते साडेसहापर्यंत अथक प्रयत्नानंतर सफारी बाहेर काढली. त्यांना तीन क्रेनची मदत घ्यावी लागली. तीन तासांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्याच खिशातील मोबाइलवरून पोलिसांनी प्रीव्हियस कॉल डिटेल्स काढले आणि औरंगाबादेतील रिपाइं (ए) युवक आघाडीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष नागराज गायकवाड यांना फोन लावला.