औरंगाबाद: ‘शीशाहो या दिल हो आखिर....टूट जाता है’, ‘उनसे मिली नजर’, ‘आयेगा आनेवाला’सारख्या २५ गाण्यांचा बहारदार कार्यक्रम शनिवारी, जानेवारीला रसिकांनी अनुभवला. स्वरसंपदा संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम संत एकनाथ नाट्यमंदिरात पार पडला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पं. विश्वनाथ ओक आणि मुंबईतील व्हायोलिन वादक मुकुंद जोग यांची उपस्थिती होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांच्या या संध्येला गायकांनी आपल्या गळ्याच्या जादूने सजवले. संपदा गोस्वामी, संदीप शहा, गिरीश धुंदे, अंकुश लालसरे, अनिरुद्ध वरणगावकर आणि सायली देशमुख यांनी गाणी गायली. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, मन्ना डे या गायकांनी अजरामर केलेल्या गाण्यांचा श्रवणीय सोहळा मनात साठवत रसिक घरी परतले.
संदीप यांनी ‘चला जाता हू किसी की धून मे’ गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘कौन है जो सपनो मे आया’, ‘रात ढलने लगी’, ‘पलभर के लिये कोई’, ‘यारा सिलीसिली बिरहा की’ अशी एकामागून एक गाणी रंगत गेली.
‘तुम रूठी रहो’, ‘जट यमला पगला’, ‘भिगी भिगी रातो मे’, ‘मुतूकुडी कव्वाडी’ ही निराळ्या धाटणीची गाणी धमाल करून गेली. ‘चलत मुसाफिर’, ‘रक जाना आना’, ‘जय जय शिवशंकर’, ‘दिल तेरा दिवाना’ ही गाणी त्या दशकांच्या आठवणी ताजे करून गेली. ‘लागा चुनरी मे दाग’ या अप्रतिम स्वरांनी संपदाने कार्यक्रमाचा शेवट केला.
विशाखा रूपल आणि नम्रता लालसरे यांनी अर्थपूर्ण निवदेनातून गाण्यांचा हा प्रवास हळूवारपणे पुढे नेला. संदीप काळेंनी ध्वनियंत्रणा सांभाळली. संगीत संयोजनाची धुरा अमित ओक यांच्याकडे होती.