आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरांसोबतच लयतालाची बहारदार सुरेल मैफल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पूर्ण कला घेतलेला चंद्र अन् ब्रह्मानंदी टाळी लावणाऱ्या स्वरांसोबतच लयतालाच्या विलक्षण जुगलबंदीचे साक्षीदार होण्याची संधी शुक्रवारी औरंगाबादकर रसिकांना लाभली. शास्त्रीय, उपशास्त्रीय गानशैलीत प्रभुत्व असलेल्या आणि चतुरस्र गायकीने रसिकांवर राज्य करणाऱ्या देवकी पंडित यांच्या निष्णात स्वरांनी "दिव्य मराठी' आयोजित सहाव्या स्वरझंकार संगीत महोत्सवाची शुक्रवारी सुरुवात झाली. तर सारंगी-व्हायोलिनची अलौकिक जुगलबंदी हृदयावर अधिराज्य गाजवणारी ठरली. पं. अतुलकुमार उपाध्ये आणि उस्ताद दिलशाद खान यांच्या समरसून टाकणाऱ्या लाजवाब वादनाने रसिक चिरतरुण झाले.

प्रोझोन मॉलच्या लॉनवर स्वरझंकार संगीत महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली. नेवपूरकर फाउंडेशनचे संचालक सचिन नेवपूरकर यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे रसग्रहण खास "दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी आपल्या जाणकार शैलीतून टिपले आहे. ते त्यांच्याच शब्दांत.....

देवकी पंडित यांची भारदस्त गायकी
राग‘श्री’मध्ये ‘सांज भये आवो तुम अब, सगुण गुणी के गाय बजाओ’ या पारंपरिक ख्यालात देवकी पंडित यांनी गायनाची सुरुवात केली. विलंबित एकतालातील ४३ मिनिटांची ही बंदिश स्वर्गीय स्वरांवर स्वार करणारी होती. करुणरस आणि आर्त भाव असलेली ही बंदिश होती. जयपूर-अत्रोली घराण्याची खासियत म्हणजे आकारातील गायकी. भारदस्त अन् भावपूर्ण आकारयुक्त आलापी घेण्याचे त्यांचे कौशल्य रसिकांच्या हृदयाला हात घालणारे होते. मींड, खटका, गमक यांच्या साह्याने त्यांनी राग सजवला. निकोप, स्वच्छ अन् तिन्ही सप्तकांत सारखा लागणारा त्यांचा स्वर अलौकिक होता. भक्तिरसप्रधान ‘पवन सुत नाम महावीर, विक्रम बजरंग’ या द्रुत बंदिशीने त्यांनी अनेक छटा दाखवल्या. या बंदिशीतील द्रुत बंदिशीतील तानांबरोबरच तार सप्तकातील अालाप मोहिनी घालणारी होती. यानंतर गुरू बबनराव हळदणकर यांचा तराणा गायनाची उत्कटता दाखवणारा होता. स्वरांगाने रागाची बढत करताना आकार, तर लयांगाने बढत करताना ताना-बोलतानांचा केलेला सुरेख वापर दाद मिळवणारा ठरला. लयीशी खेळणारी ही रचना गायकासोबतच रसिकांना घेऊन चालणारी होती. मैफलीला पुढे सरकवताना देवकीताईंनी राग शंकरातील ‘अनाहत नाद को भेद पायो’ ही बंदिश ऐकवली. जयपूर-अत्रोली घराण्याची तालीम अन् गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचे भावपूर्ण स्पष्टोच्चार तसेच पं. हळदणकरांकडून आलेला लयकारीचा संस्कार हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घराण्याच्या वैशिष्ट्यांचे बेमालूमपणे आपल्या शैलीत रूपांतरण करत रसिकांना आस्वाद देण्याची जादू त्यांनाच जमते. "जटाजूट गंगा बिराजे कर त्रिशूल’ या द्रुत बंदिशीनंतर ठुमरीने त्यांनी स्वरमंचाचा निरोप घेतला. त्यांच्या गायनाशी सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीने संवाद साधला. तर तबल्यावर लयतालाचे सौंदर्य नीलेश रणदिवे यांनी जपले. तानपुऱ्यावर क्षितिजा सहस्रबुद्धे आणि नेहा देशपांडे यांनी साथ केली.

नादमाधुर्याने भरलेली जुगलबंदी
मैफलीच्या दुसऱ्या टप्प्यात पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या व्हायोलिनची आणि उस्ताद दिलशाद खान यांच्या सारंगीची अप्रतिम जुगलबंदी ऐकण्याची संधी रसिकांना लाभली. राग चारुकेशीत त्यांनी वादनाला सुरुवात केली. अतिशय पुरातन अशा सारंगीसोबत आधुनिक व्हायोलिनचीही समरसून टाकणारी जुगलबंदी लय-ताल स्वरांना एकरूप करणारी ठरली. आलाप, जोड, झाला सुरेख रंगला. या दोन वाद्यांचे मूळ स्वभावधर्म सारखे आहेत. जुगलबंदी असली तरीही दोन्ही वादकांनी इतक्या सामर्थ्याने वादन केले की जणू काही दोन वाद्यांचा संवाद असावा अशी प्रचिती आली.

दोन गायक सोबतच गात एखादी रमणीय बंदिश फुलवत असल्याचा अनुभव रसिकांना आला. सुरेल प्रवास घडवताना नादमाधुर्याकडे दोघांचेही विशेष लक्ष होते. रसिकांसोबत ते स्वत:देखील आस्वाद घेत असल्याने रागाचे सौंदर्य आणखीनच खुलत गेले. कधी मवाळ घसीट तर कधी आक्रमक जमजमा यांच्या साह्याने चारुकेशीत रंग भरला. वेगवेगळ्या तिहाया घेत नजाकतीने समेवर येत त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. शेवटाकडे जाताना खमाजची धून चित्तवेधक ठरली. धूनमध्ये रागाबाहेर जाताना बाराही स्वरांमध्ये स्वैरपणे विहार करून पुन्हा मूळ खमाजमध्ये येणे हे लाजवाब होते. वाद्याला हवी असते तशी खुमासदार, समर्पक तबल्याची संगत पं. रामदास पळसुले यांनी केली. त्यांची नजाकत, आक्रमकता, तयारी, लयतालाचा विचार त्यांच्या वादनातून स्पष्ट झाला. वीणा गोखले यांनी आशयसंपन्न निवेदनात मैफल गुंफली.
{सचिन नेवपूरकर, औरंगाबाद
यांची होती उपस्थिती
महोत्सवाचेउद््घाटन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. दीपप्रज्वलन करण्यासाठी व्हेरॉक ग्रुपचे व्हाइस प्रेसिडेंट एम. पी. शर्मा, प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सचिन घाणेकर, "दिव्य मराठी'चे महाराष्ट्र संपादक प्रशांत दीक्षित, गायिका देवकी पंडित आणि व्हायोलिन अकादमीचे तेजस उपाध्ये यांची उपस्थिती होती.

उस्ताद दिलशाद खान
तबलावादक पं. रामदास पळसुले यांचा सत्कार करताना प्रोझोन अध्यक्ष अनिल इरावणे.
पं. अतुलकुमार उपाध्ये यांचा सत्कार करताना व्हेरॉक इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष एम.पी. शर्मा.
कार्यक्रमास रसिकांची अशी अलोट गर्दी झाली होती. छाया: रवी खंडाळकर, अरुण तळेकर