आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swarazankar Of Daily Divya Marathi's Music Concert

स्वरझंकार: हुजूर इस कदर भी इतराके चलिये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : गीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित गुरुवर्य नाथराव नेरळकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पं. अतुलकुमार उपाध्ये, एम.पी. शर्मा, पं. सुरेश वाडकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अनिल इरावणे आणि दिव्य मराठीचे महाराष्ट्र संपादक प्रशांत दीक्षित.
शास्त्रीय रागदारी ते ‘हुजूर इस कदर भी इतराके चलिये’ अन् ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ सारख्या हृदयात घर करणाऱ्या स्वरांनी औरंगाबादकर रसिक रविवारी स्वरचिंब झाले. ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर यांच्या दिमाखदार गायनाने रसिकांना तृप्त केले. तर स्वरसंध्येची सुरुवात राहुल शर्मा यांनी केली. नादमाधुर्याने चैतन्य निर्माण करणाऱ्या शर्मा यांनी तंतुवादनाचे सामर्थ्य दाखवले. हूरहूर लावणाऱ्या वातावरणात स्वरमंचाने दर्दी रसिकांचा निरोप घेतला. महोत्सवाचे आजचे क्षण हृदयात साठवत केलेला हा अलविदा अविस्मरणीय ठरला. प्रोझाेनच्या लॉनवर एक एक क्षण सौंदर्याने फुलत गेला. या सोनेरी क्षणांचे साक्षीदार वाचकही व्हावेत म्हणून पं. विश्वनाथ दाशरथे यांनी ‘दिव्य मराठी’ साठी केलेले हे खास वार्तांकन, त्यांच्याच शब्दांत...
संतूरच्या मंजूळ तारांशी खेळत वाढलेले राहुल शर्मा यांनी स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. संतूरच्या तारांशी लीलया संवाद साधत एक आश्वासक घरंदाज परंपरा जोपासणारा कलाकार म्हणून संगीत क्षेत्रात सातत्याने चर्चेत असलेले राहुल आपली जादू पहिल्या स्पर्शातच दाखवून गेले. त्यांच्या वादनातील आलापींचे चातुर्य, रागरसाशी सुसंगत बढत आणि रंजकता यासोबतच रागदारीशी संवाद साधणारे सादरीकरण मोहून टाकणारे होते. शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी अन् कर्नाटकी संगीताने व्यापलेले आहे. त्यामुळे राहुल यांनी कर्नाटकी संगीतातील वाचस्पती रागाचे सौंदर्य संतूरच्या १०० तारा नजाकतीने छेडत रसिकांपर्यंत पोहोचवले. अलाप, जोड नंतर झाला वादनातील चपळता आणि तालाच्या लयीशी खेळत केलेला लयकारीचा आस्वाद हृदयसंवाद साधणारा होता. ‘कलम’ ने तारांवर होणारे आघात स्वरांशी लडीवाळपणे खेळत उपज अंगाने स्वरतोरण रचत होते.
वाचस्पती रागाला रूपक तालाची दिलेली साथ अवर्णनीय होती. मध्यलयीतील गत तीनतालात सुरेख पद्धतीने बांधली होती. तालाचा घाट आणि रागाच्या धाटणीने जाणारी गत, तालांवरील पकड तसेच रागावरील स्वरसामर्थ्य सिद्ध करणारी होती. कर्नाटकी पद्धतीचे प्राबल्य असलेला राग हिंदुस्थानी शैलीने वाजवत त्यांनी रसिकांना चकीत केले. यानंतर राग पहाडीमध्ये रचलेली पहाडी धून , दादरा तालाचे मनोहर रूप दर्शवत होती. संतूरसारखे मूळ भारतीय वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्युजन अर्थात मिलाफ वृंदवादनाच्या माध्यमातून नेण्याचे श्रेय राहुल शर्मा यांनाच जाते. मराठवाड्याचे पं. मुकेश जाधव यांनी तबल्याची समर्पक साथ देत संतूरच्या बेमिसाल स्वरांना रसिकांपर्यंत लीलया पोहाेचवले.
“हमनेभी तेरे हर इक गम को गले से लगाया है, है ना !’
विख्यातपार्श्वगायक पं. सुरेश वाडकर यांचे शास्त्रीय गायन ऐकणे ही पर्वणी औरंगाबादकरांना पहिल्यांदाच लाभली. कठोर खर्ज साधना आणि रियाजातील सातत्य यातून स्वरांना मिळणारी गांभीर्ययुक्त खोली आणि गोलाई याचे उत्तम वस्तुपाठ त्यांच्या गायनातून रसिकांना अनुभवता आले.
श्रेात्यांच्या डोळ्यांतील भाव जाणत एक सुंदरसे स्मित चेहऱ्यावर आणले अन् रसिकांना केव्हा स्वरांशी एकरूप केले हे कुणालाही कळले नाही. यमन रागातील ‘अमर गान गाए’ या विलंबित ख्यालाने त्यांनी गायनाची सुरुवात केली. आलापीतील बोलबाट बंदिशीला अर्थवाही पद्धतीने मांडत होते. एक कसलेला शास्त्रीय गायक, आवाजातील लगावाचा पुरेपूर उपयोग करून घेत रागातील बढत करताना सुरेशदादांच्या निमित्ताने औरंगाबादकरांनी अनुभवला. तालाचा घाट सांभाळत नजाकतीने समेवर जाऊन भिडण्याची पद्धत, त्याला गानमुद्रांची सुसंगत जोड मैफलीत रंग भरत होते. खऱ्या अर्थाने श्राेते स्वरझंकारच्या माध्यमातून पं. वाडकरांच्या गायनातून अमर गान अनुभवत होते.
या रागातील निषादाचे प्राबल्य शुद्ध आणि निकोप पद्धतीने दाखवत त्यांनी सर्वांवर अधिराज्य गाजवले. प-रे या रागवाचक संगतीचा रागसौंदर्य शास्त्राच्या तौलनिक मानदंडाचा उपयोग करत त्यांचे गुरू पं. जियालाल वर्मा यांची ही रचना त्यांनी सजवली होती.
यानंतर ‘सरस सुगंधा रैना’ ही द्रुत तीनतालातील बंदिश सादर करताना त्यांनी केलेली लयकारी, अलंकारिक ताना, जबड्याची तान, मिश्र तान यांचा केलेला वापर मैफल सरस आणि रात्र स्वरगंधीत करणारी होती. मैफलीपूर्वी गुरूविषयी बोलताना त्यांच्या दाटून येणाऱ्या भावना त्यांनी गायलेल्या ‘ओंकार स्वरूपा सद््गुरू समर्था’ या गाण्यातून तरळपणे मांडल्या. पार्श्वगायक म्हणून ख्यातकीर्त असलेले पं. वाडकर ‘दिल है तो धडकने का बहाना कोई ढुंडे’ असे म्हणत ‘सिने मे जलन’ ही हळवी करणारी गझल गाऊन गेले. रसिकांच्या मनाच्या तारा छेडत त्यांनी सर्वांना समरसून घेतले. गबन या चित्रपटासाठी पहिल्यांदाच गायलेली ही गझल त्यांच्या हृदयाच्या जवळ असल्याने त्यांनी ती रसिकांपर्यंतही पोहाेचली. यानंतर ‘और इस दिल मे क्या रख्खा है’ , ‘दयाघना’ ही गाणी घेत त्यांनी दाद मिळवली.तर त्यांनी स्वरांचे झंकार करत रसिकांना अक्षरश: स्वरांवर खिळवले. "हुजूर इस तरह भी इतराके चलीये' या गाण्याने सर्वांना स्वरांत गुंफले. "अजहू आये बलमा, सावन बिता जाये', "पाहिले मी तुला' ही फर्माईशीची गाणीही त्यांनी खास रसिकांसाठी गायिली. ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ या माईलस्टोन गाण्यावर तर एकच जल्लोष झाला. अन् 'चप्पा चप्पा चरखा चले' चा काहूर आबालवृद्धांमध्येही जोश भरून गेला.