आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारपासून रसिकांवर "स्वरझंकार'चे गारूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठवाड्याच्या भूमीवर स्वरांची जादू कायम आहे. या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा देखणा स्वर-सोहळा "दिव्य मराठी'च्या वतीने गेल्या वर्षांपासून आयोजित केला जात आहे. "स्वरझंकार' संगीत महोत्सवाच्या माध्यमातून दिग्गज कलावंतांचे गायन-वादन अनुभवण्याची संधी शुक्रवारपासून उपलब्ध होत आहे. या महोत्सवाचा श्रीगणेशा प्रख्यात गायिका देवकी पंडित, उस्ताद दिलशाद खाँ यांच्या स्वरांनी तर पं. अतुलकुमार उपाध्येंच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे.

प्रोझोन मॉलच्या लॉनवर २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला होणाऱ्या या सोहळ्यात स्वर-सुरांची जुलगबंदी अनुभवण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. "दिव्य मराठी', पुण्याची व्हायोलिन अकादमी यांच्यातर्फे आयोजित या महोत्सवाचे प्रायोजक व्हेरॉक ग्रुपने स्वीकारले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आशा खाडिलकर यांचे गायन आणि पं. निलाद्रीकुमार यांचे सतारवादन अनुभवता येणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी प्रसिद्ध संतूरवादक पं. राहुल शर्मा आणि तबलावादक पं. मुकेश जाधव यांची जुगलबंदी रसिकांना साद घालेल. महोत्सवाची सांगता पार्श्वगायक सुरेश वाडकरांच्या स्वरांनी होणार आहे.

देवकी पंडित यांच्या गायनाचा स्वर्गीय अनुभव : आग्रा,जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा संगम ज्यांच्या गळ्यात आहे, अशा प्रख्यात शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचे स्वर अनुभवणे हा एक स्वर्गीय अनुभव आहे. सातासमुद्रापारही त्यांच्या स्वरांची लहर आहे. हरिहरन आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह त्यांनी केलेला फ्यूजन अल्बम आजच्या तरुणाईला साद घालणारा आहे.


पं. अतुलकुमार उपाध्येंच्या व्हायोलिनची जादू
गायकी अन् तंतुकारीचा सुरेख मिलाफ असलेले पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन महोत्सवातील अद्भुत अनुभव असेल. गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले, पं. श्रीधर पार्सेकर, डॉ. यहुदी मेन्युहिन यांची परंपरा त्यांना लाभली आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताच्या वादनावर त्यांनी प्रभुत्व सिद्ध केले आहे. देश-परदेशातील अनेक नामांकित महोत्सवांत त्यांच्या व्हायोलिनची जादू पसरली आहे. व्हायोलिन अकादमीच्या माध्यमातून स्वरझंकार संगीत महोत्सव विविध ठिकाणी आयोजित करून ते संगीतसेवा करत आहेत.