आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये आढळले स्वाइन फ्लूचे आणखी चार रुग्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वाइन फ्लूचे आणखी चार रुग्ण घाटीत दाखल झाले आहेत. २१ जानेवारीला स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या शब्बीर मुस्तफा हुसेन यांच्या जवळच्या नातेवाइकांना लागण होऊ नये म्हणून टॅमी फ्लूची औषधी देण्यात आली होती. मात्र, त्यापैकी चार जणांना शनिवारी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय शुक्रवारी दाखल दोन्ही रुग्णांची प्रकृतीदेखील स्थिर असल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.

शब्बीर हुसेन यांचा बुधवारी दुपारी चार वाजता स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी सकाळी मनपाचे पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांच्या नेतृत्वाखाली हुसेन यांच्या घरी गेले होते. जवळच्या नातेवाइकांतील १० जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्याही सुरक्षेचा उपाय म्हणून देण्यात आल्या होत्या. तरीही दोन महिलांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू लागली. ३२ आणि ४४ वर्षांच्या महिलांसह दोन २७ वर्षांच्या तरुणांनाही याची लागण झाली आहे.

दावा फोल : हुसेन यांच्या मृत्यूनंतर शहरात स्वाइन फ्लूची साथ पसरणार नाही, असा दावा मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी केला होता. मात्र दोन दिवसांत शहरात ६ रुग्णांना लागण झाली आहे.

तत्काळ मदत घ्या
हुसेन यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी, जवळचे नातेवाइक सर्वांनी काळजी घ्यायला हवी. स्वाइन फ्लूची लक्षणे जाणवताच वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन घाटीच्या औषधी विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी केले आहे.