आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तबल्याच्या अप्रतिम बंदिशी; मृदंग कीर्तनाने रसिक श्रोते दंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- संगीताला ताल देणार्‍या तबल्याचा अनोखा साज आहे. प्रख्यात तबलागुरू पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्य परिवाराने रविवारी (25 ऑगस्ट) तापडिया नाट्यमंदिरात सादर केलेल्या अनोख्या तबला वादनाने संपूर्ण सभागृह भारावले. पेशकार, कायदे, रेले, गत आणि तुकडे यांच्यासह ‘मृदंग कीर्तना’च्या अनोख्या पर्वणीने कार्यक्रमाचा स्वर्गीय आनंद रसिक श्रोत्यांना मिळवून दिला.

पं. तळवलकर यांचा शिष्य परिवार आणि पूर्णओम पूर्णवादी संगीत अकादमी यांच्या विद्यमाने या विशेष ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खमाजमधील नगमा रागातील पहिल्याच रचनाने शिष्यांनी केलेले सादरीकरण कार्यक्रमाची उंची दाखवणारे होते. तीन तालामध्ये आणि मध्यलयीत बांधलेली ही रचना ब्रrानादाची अनुभूती देणारी होती. ‘नाद मे ब्रrा शिव नारायण समारुप’ ही रचना नादाचे आणि ब्रrा, शिव आणि नारायणाचे नाते विशद करणारी होती. तबल्यात असलेल्या विस्तारक्षम प्रकारात मोडणार्‍या या रचनेत पेशकार, कायदे आणि रेले यांची जुगलबंदी रसिकांना सुखावणारी होती. यामध्ये ‘धातिरकिट धाक्ड धाधिंगा’ हा पेशकार तर पुढे कायदे, रेले, तुकडे, तिहाई आणि चक्रदार वाढत्या लयीनुसार सादर करण्यात आले. यानंतर अविस्तारक्षम असलेले तुकडे आणि गत असलेली ‘श्याम श्याम राज पावे सोई, मनहरी सदा नित जेई, हरी गुरु रत होई’ ही असाधारण अशी रचना सादर करताना क्षणोक्षणी सभागृहातून दाद मिळत होती.

द्रुत तीन तालातील ही रचना पिलू रागात लीलया बांधण्यात आली होती. अर्धातास या रचनेने सभागृहातील प्रत्येकाच्या मनाच्या तारा छेडल्या. यानंतर पं. तळवलकर यांची निर्मिती असलेले पखवाजच्या साथीने केलेले ‘मृदंग कीर्तन’ साक्षात इंद्रसभेत असल्याचा अनुभव देणारी होती. चार पखवाज वादक शिष्यांच्या साथीने पंडितजींनी यामध्ये ‘पढंत’ केले. धमार तालातील 14 मात्रांची ही रचना शिवकल्याण रागात बांधण्यात आली होती, तर 12 मात्रा असलेल्या चौतालातील आणि बिहाग रागातील रचनेने सोहळा चिरकाल संस्मरणीय ठरवला.

यामध्ये जगमित्र लिंगाडे, भार्गव देशमुख, स्वानंद गोमटे, गणेश डोळे, इशान मक्तेदार, सुधांशू परळीकर, ऋतुराज हिंगे, संतोष देशमुख, प्रशांत गाजरे, संदीप घोडेकर, विजय खिस्ती, दत्ता गोगटे आणि निशात कदम यांनी तबलावादन केले. तर मृदंग कीर्तनात गोविंद भिलारे, ओंकार दळवी, गणेश पापळ आणि सुजित लोहारे यांनी पखवाज वादन केले.

स्वप्ना दातार यांनी व्हायोलिनवर, तन्मय देवचक्के यांनी संवादिनीवर, विनय रामदासन यांनी गायनाची तर आशय कुलकर्णी यांनी टाळावर साथसंगत केली. संजीव शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.