आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंतनाशक गोळी आवडली म्हणून मुलाने खाल्ल्या मित्रांच्याही गोळ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मॅडमने आम्हाला सर्वांना गोळ्या वाटल्या. माझी गोळी खाल्ल्यावर मला ती आवडली म्हणून मी मित्रांच्याही चार मागून खाल्ल्या. नंतर मात्र मला कसेतरीच होऊ लागले, असे गळ्यात नळी टाकलेला ७ वीचा विद्यार्थी मुजम्मील शेख जमील घाटीतील खाटेवर पडून सांगत होता. 

राज्यभरातील शाळांमध्ये शुक्रवारी मुलांना जंतनाशक औषधी देण्यात आली. शहरात महानगरपालिकेच्या ७० शाळा आहेत. यातील सिल्कमिल कॉलनी येथील मनपा शाळेत जमील शिकतो. या शाळेत २०० मुलांमागे ८ शिक्षिका आहेत. मात्र, यातील २ प्रसूती रजेवर गेल्याने ६ शिक्षिकांवरच शाळेचा भार होता. शुक्रवारी जंतनाशक डोसची मोहीम होती. मुलांचे व्यवस्थापन नीट व्हावे यासाठी मुख्याध्यापिका शहनाज परवीन यांनी दिवसांपूर्वी एका तरुणीला वर्ग सांभाळण्यासाठी पाचारण केले. तिच्याच वर्गात ही घटना घडली. 

जमीलने ४ गोळ्या खाल्ल्या अन् त्याची प्रकृती खालावू लागली. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन त्याला तत्काळ घाटीत आणले गेले. मेडिसीन विभागाच्या वॉर्ड क्र. २ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू झाले. या घटनेची माहिती मिळताच उपमहापौर स्मिता घोगरे आणि मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी घाटीत धाव घेतली. डॉ. कुलकर्णी यांनी मुलाची विचारपूस केली. घाटीतील डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. उपचारांच्या कागदपत्रांचीही पाहणी केली. या वेळी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, केंद्रप्रमुख अलका भडकेही उपस्थित होते. 

बाहेरील शिक्षक नेमला कसा?
हीबाब खूप गंभीर आहे. सर्व शिक्षिकांना बोलावून घ्या, असे आदेश श्रीकांत कुलकर्णींनी दिले. 
१०लाख २५ हजार विद्यार्थ्यांना डोस : जिल्ह्यातीलशासकीय शाळांच्या १० लाख २५ हजार ९४६ तर मनपाच्या ७२ शाळांमधील १५००० विद्यार्थ्यांना आणि १३० बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. जंतनाशक गोळया देण्यात आल्या असून, यातून जे विद्यार्थी राहिले आहेत.त्यांना २३ ऑगस्ट रोजी गोळ्या देण्यात येतील, अशी माहिती जि.प.आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.बी.खतगावकर यांनी दिली. 

यानिमित्ताने त्याचे पोट तरी साफ होईल : केंद्रप्रमुख 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घाटीत धावले. या वेळी केंद्रप्रमुख अलका भडकेही आल्या. या घटनेविषयी त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी उत्तर दिले की, त्याने गोळ्या शिक्षिकेच्या हातून ओढून घेतल्या. जाऊ द्या, बरा आहे तो. यानिमित्ताने त्याचे पोट साफ होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. 

गंभीर बाब नाही, प्रकृती स्थिर 
यामुलाने एकापेक्षा अधिक गोळ्या खाल्ल्या हे खरे आहे. मात्र, त्याने उलटी केली आहे. याशिवाय जिवावर बेतावे असे या औषधीत काही नाही. सध्या तो स्थिर आहे. निरीक्षणासाठी आम्ही त्याला चोवीस तास ठेवून घेऊ. 
-डॉ.प्रशांत पवार, बालरोग विभागप्रमुख, घाटी 

एकदाच चार गोळ्या दिल्याच कशा? 
सर्व शाळांतील शिक्षकांना आम्ही या आरोग्य कार्यक्रमासंदर्भात प्रशिक्षण दिले होते. मुलांना गोळी हातात द्या आणि त्याने ती घेतल्याची खात्री झाल्यावर कागदावर नोंद करा. मग दुसऱ्याला गोळी द्या, असे प्रशिक्षणात स्पष्ट केले असतानाही शिक्षिकेने गोळ्या दिल्याच कशा, असा सवाल डॉ. जयश्री कुलकर्णींनी केला. 
बातम्या आणखी आहेत...