आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांच्या पथकास नऊ वाळू माफियांकडून मारहाण, नायब तहसीलदारांसह 4 तलाठी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गेवराई येथील तहसीलदारांच्या पथकावर नऊ वाळू माफियांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक करत मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गुंतेगाव येथे शुक्रवारी पहाटे एक वाजता घडली. या हल्ल्यात नायब तहसीलदारांसह अन्य चार तलाठी जखमी झाले आहेत. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून यातील कारचालकास अटक करण्यात आली आहे. 

गुंतेगाव येथील गोदावरीच्या पात्रातून सध्या बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. येथे गेवराई तहसीलदारांच्या पथकात नायब तहसीलदार वैजनाथ जोशी, तलाठी राहुल मिसाळ, माणिक पांढरे, प्रकाश निकाळजे, अशोक खिंडरे आणि चालक सत्तार हे शुक्रवारी पहाटे दीड वाजता जीपने (एमएच २३ एफ १००४) गुंतेगाव येथील गोदावरीच्या पात्रात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. पथकाने एक वाळूचा ट्रक ताब्यात घेतला तेव्हा कारमधून (एमएच २३.५५९९) आलेल्या नऊ वाळू माफियांनी पथकातील महसूलचे अधिकारी गोदावरी पात्रात उतरत असल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेत वेड्या बाभळीच्या आडून अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. 

यानंतर केलेल्या मारहाणीत नायब तहसीलदार वैजिनाथ जोशी, तलाठी राहुल मिसाळ, माणिक पांढरे, प्रकाश निकाळजे, अशोक खिंडरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी नायब तहसीलदार वैजिनाथ जोशी यांच्या तक्रारीवरून चकलांबा पोलिस ठाण्यात विकास गोरडे, कृष्णा गोरडे, शेख हारुण, शेख अन्वर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी हल्ल्यातील कार ताब्यात घेतली आहे. अधिक तपास फौजदार एन. एम. शेख हे करत आहेत. दरम्यान, वाळू माफियांच्या शोध घेण्यासाठी फौजदार एन. एम. शेख यांचे एक पथक फिरत असल्याचे चकलांबा ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप तेजनकर यांनी सांगितले. 

हल्ला करणाऱ्यांवर कारवाई 
कायदेशीर प्रक्रियेमध्ये महसूल अधिकारी -कर्मचारी कर्तव्य बजावताना त्यांच्यावर कोणीही हल्ला करू नये. नियमाचे पालन केलेच पाहिजे. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. 
- आशिषकुमार बिरादार, तहसीलदार, गेवराई. 

2 वर्षांपूर्वी मंडळ अधिकाऱ्यांवर हल्ला 
दोन वर्षांपूर्वी तलवाड्याजवळील भोगलगाव येथे मंडळाधिकारी बाबासाहेब खेडकर, तलाठी आर. बी. सानप यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. यात कर्मचारी जखमी झाले होते. मागील वर्षी तर संगम जळगाव येथे वाळू माफियांनी नायब तहसीलदार एम. एन. गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. 

पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर घाट सुरू 
गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्राचे ३२ घाट असून तालुक्यात २०१५ मध्ये तपेनिमगाव, राक्षसभुवन, सुरळेगाव, सावरगाव, आगर नांदूर, कुरणपिंपरी हे वाळू घाट सुरू होते. त्यानंतर हे वाळू घाट बंद झालेले असून दोन वर्षांनंतर आता पर्यावरण विभागाने गुंतेगाव, राजापूर, तपे निमगाव, गुळज, सुरळेगावला मंजुरी दिली असून सध्या याची प्रकिया सुरू आहे. महसूल विभागाच्या पथकाने आतापर्यंत ९७ कारवाया करून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...