औरंगाबाद - एकीकडे मनपाकडे कर वसूल होत नसल्याने तिजोरीत खडखडाट, तर दुसरीकडे नागरिकांकडून घरगुती नळांचा वापर व्यावसायिक कामांसाठी होत असल्याने मनपाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे समांतर कंपनीकडून पुढील आठवड्यापासून घरगुती नळांचा वापर व्यवसायासाठी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
समांतरने केलेल्या सर्वेक्षणात घरगुती नळांचा वापर नागरिक व्यवसायासाठी करीत असल्याचे दिसून आले. शहरात जवळपास सात हजार घरगुती नळांचा वापर व्यवसायासाठी करण्यात येत असल्याचा अंदाज समांतरकडून वर्तवण्यात आला आहे. हेच नळ व्यावसायिक झाल्यास मनपा कंपनीला चांगला महसूल मिळू शकतो. घरगुती नळांचा वापर व्यवसायासाठी करणाऱ्यांनी आठवड्यात नजीकच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधून त्याचे व्यावसायिक नळ जोडणीत रूपांतर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर मात्र मनपा पाणीपुरवठा पाणीपट्टी उपविधी अधिनियमांतर्गत दंडात्मक, कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कंपनीचे अधिकारी अवीक बिस्वास यांनी कळवले. नागरिकांनीही आपल्या शेजारी घरगुती नळ जोडणीचा वापर व्यावसायिक वापरासाठी होत असल्यास ०२४०-६६५५००० कळवावे. नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतीयळे यांनी कळवले.