आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उशिरा येणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉक्टर २० मिनिटे उशिरा आल्याने हृदयविकाराच्या रुग्णाला जीव गमवावा लागला, असा आरोप करत शिवसैनिकांनी शुक्रवारी घाटीत गोंधळ घातला. डॉक्टर उशिरा का आले, याचे उत्तर द्या आणि त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी घटनास्थळी उपस्थित असलेले नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी केली. मात्र, रुग्णाच्या मृत्यूस डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही, असे सांगत घाटीच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ शांत केला.

दादासाहेब रगडे (४५) यांना इलेक्ट्रिकचे काम करत असताना दुपारी १२ च्या सुमारास घाम आला, छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना डॉ. झंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. झंवर यांनी रगडे यांना तपासून हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट केले. तत्काळ जवळच्या मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. या वेळी शिवसेना कार्यकर्ते किरण गणोरे हे झंवर रुग्णालयात उपचारार्थ आले होते. खासगी रुग्णालयाचा खर्च शक्य होणार नाही म्हणत रगडे यांनी घाटीत घेऊन चला, अशी विनंती केली. त्यानुसार त्यांना घाटीत आणले.
या ठिकाणी (आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी) सीएमओ डॉ. आदिब हुसेन आणि डॉ. सादिया सिद्दिकी यांनी सॉर्बिटरची गोळी दिली. यामुळे रक्तातील गुठळी वितळते. तसेच व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन झाले असल्याने शॉक देऊन डिफिब्रिलेशन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, १५ मिनिटांत रगडे यांचा मृत्यू झाला. दरम्यानच्या वेळात मेडिसिन विभागाच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ते वेळा फोन केला. मात्र, दरवेळी "येत आहे' असेच उत्तर देण्यात आले. नगरसेवक शिरसाट घटनास्थळी दाखल झाले. निवासी डॉक्टरच्या दिरंगाईमुळे रुग्णाला जीव गमवावा लागला, असे म्हणत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी मेडिसिन विभागाच्या या डॉक्टरला जाब विचारून तत्काळ कारवाई करा, अशी मागणी करत शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. मेडिसिनच्या विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर आणि अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर या वेळी दाखल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहत दोघांनीही शिवसेना कार्यकर्त्यांना शांत केले.
लेखी उत्तर हवे
- घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी येण्यास उशीर केल्याने रुग्णाला जीव गमवावा लागला. रगडे आमच्या परिचयातील होते, त्यामुळे आम्ही पोहोचलो. पण घाटीत असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची असते. त्यांनाही डॉक्टर अशाच पद्धतीने हाताळतात. यासाठी आम्ही या घटनेचा जाब विचारत आहोत. त्या डॉक्टरवर कारवाई व्हायलाच हवी.
सिद्धांत शिरसाट, नगरसेवक
घटनेची चौकशी करून कारवाई करू
- रुग्ण दाखल झाल्यानंतर उपलब्ध डॉक्टरांनी योग्य उपचार दिलेले आहेत. कुठलाही निष्काळजीपणा झालेला नाही. मात्र, मेडिसिनचे डॉक्टर आल्याने संतप्त कार्यकर्त्यांचा पारा चढला. तरीही संबंधित प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू.
डॉ. सुहास जेवळीकर, अधीक्षक, घाटी रुग्णालय
बातम्या आणखी आहेत...