आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय मुलांच्या सुरक्षित प्रवासाची घ्या काळजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर जिल्ह्यात प्रवासी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर निर्बंध घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची (अारटीओ) पथके नियमाप्रमाणे कडक आणि सक्तीची कारवाई करीत आहेत. पण त्याबरोबरच आपल्या पाल्यांना त्रास होऊ नये, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी शालेय बसेसला फिटनेस परवाना मिळाला का, याची पालक आणि शाळा व्यवस्थापनानेच शहानिशा करावी. असा परवाना नसेल तर पाल्यांना अशा बसेसमध्ये धाडू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना घर ते शाळा ये-जा करण्यासाठी शहरात ५७१ बसेस आहेत. त्यापैकी केवळ ८६ बसेस शाळांच्या मालकीच्या असून उर्वरित सर्व ४८५ बसेस करारावर चालतात. ३१ मेपर्यंत सर्व स्कूल बसचालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. तसे नागपूर उच्च न्यायालयाचे आदेशच आहेत. मात्र, त्याकडे बहुतांश बसचालकांनी दुर्लक्ष केले. फिटनेस नसलेले वाहन सुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरते. याबाबत शालेय मुले अनभिज्ञ असतात. पालकही जागृत नाहीत. दुसरी बाब म्हणजे काय होते, असा फाजील आत्मविश्वास बाळगला जात आहे. शाळा व्यवस्थापनाला या बाबी माहिती आहेत, पण ते याविषयी ब्र शब्दही बोलत नाहीत.
पालक,मुलांच्या अडचणींचा घेतला जातो फायदा : काळीपिवळी,टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, खासगी व्हॅन, टेम्पो ट्रॅव्हलर यामधूनही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेले जातात. ती रोखण्यासाठी गत गुरुवारपासून आरटीओच्या चार पथकांद्वारे मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. पण कारवाई करत असताना वाहनात विद्यार्थी बसलेले असतात. टीव्ही सेंटर, चिकलठाणा येथून ही वाहने ताब्यात घेऊन आरटीओ कार्यालयात लावायचे म्हटले तर शालेय विद्यार्थ्यांची हेळसांड होते. शिवाय दुसऱ्या दिवशी शाळेतही जाता येणार नाही. या पालक मुलांच्या अडचणींचा चालक फायदा घेत आहेत. याकडे पालकांचे लक्ष वेधून आरटीओ शेळके यांनी परवाना असलेल्या वाहनांची खात्री करूनच मुलांना त्यामध्ये पाठवावे, वाहन वैधतेबाबत शाळा प्रशासन परिवहन समितीकडून माहिती घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

अशी होणार कारवाई
नियमावलीनुसारस्कूल बसमध्ये आवश्यक ते फेरबदल करून घ्यावेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाबींची पूर्तता करावी. नोंदणी प्राधिकरणाची मान्यता घ्यावी, अन्यथा नियमाचे उल्लंघन करणे, अवैधरीत्या विद्यार्थी वाहतूक करताना आढळून आल्यास वाहनमालकावर दंडात्मक कारवाई, वाहन नोंदणी रद्द करणे, स्क्रॅप करण्यात येणार असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...