आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी गुन्हा दाखल करावा, नंतर समुपदेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिला तक्रारीसाठी आली की तक्रार नोंदवण्याऐवजी त्यांचे समुपदेशन केले जाते, महिला बाजूला राहते अन् सुरू राहते ती चर्चा. मात्र, यापुढे समुपदेशन जरी करायचे असेल तर त्याआधी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अन् नंतरच पुढील गोष्टी असे स्पष्ट निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शाह यांनी पोलिसांना दिले आहेत. शाह मंगळवारी औरंगाबादेत होत्या. येथील 64 प्रकरणांवर त्यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी ज्योत्स्ना विसपुते, आशा भिसे यांच्यासह सहा सदस्या उपस्थित होत्या.

महिला आयोगाच्या वतीने वेगवेगळ्या भागात महिला प्रकरणांची सुनावणी घेण्यात येते. त्यानुसार त्या आज औरंगाबादेत होत्या. जिल्हाधिका-यांच्या सभागृहात त्यांनी सर्व प्रकरणांची सुनावणी घेतली. 64 पैकी बहुतांश प्रकरणांत माफी नामे, समेट झाल्याचे त्यांनी सांगितले. महिला तक्रार निवारण मंचची स्थापना झाल्यापासून आधी समुपदेशन केले जाते. त्यात यश आले नाही तरच गुन्हा दाखल केला जातो. मात्र, समुपदेशनातच प्रकरण निकाली निघावे यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतरच आधी गुन्हा नंतर समुपदेशन असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निवारण केंद्र स्थापन करावे : प्रत्येक व्यक्तीकडून शासनाने काही तरी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र शासन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या पक्षांनीही यात महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या स्तरावर समुपदेशन केंद्र स्थापन करावे, जेणेकरून गरजू महिलांना वेळीच न्याय मिळू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

प्रत्येक ठाण्यात फलक
महिला आयोगाचे निर्देश नेमके काय आहेत, याची सूचना असणारे फलक प्रत्येक पोलिस ठाण्यात लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तक्रारदार महिलांना सर्व माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
काय असतात महिलांच्या तक्रारी : कौटुंबिक हिंसाचार, शासकीय कार्यालयात लैंंगिक शोषण, मालमत्तांचे वाद.