औरंगाबाद - ‘थ्री इडियट्स’मधील एक प्रसंग. विमानात माधवनला रँचो म्हणजे
सापडल्याचा मेसेज येतो. टेकऑफ करणारे विमान थांबवण्यासाठी माधवन हॉर्टअॅटॅक आल्याचा बनाव करतो आणि विमान इमर्जन्सी लँडिंग करते. तसाच प्रसंग गुरुवारी स्पाइसजेटच्या औरंगाबादहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात घडला. विमान टेकऑफ करत असतानाच एका महिलेने मला खाली उतरायचे आहे, असा हट्ट धरला. त्यापुढे नमते घेत विमान थांबवण्यात आले.
विमानात माजी महापौर डॉ. भागवत कराड, युवक काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. रमेश रोहिवाल आदींसह सुमारे २०० प्रवासी होते. डॉ. देहाडे म्हणाले, दुपारी १२:२० ला विमान उड्डाण घेणार होते. प्रवाशांनी सीटबेल्ट बांधले. सर्व गॅजेट,
मोबाइल बंद केले.विमान धावपट्टीवर १० ते २० सेकंद पुढे सरकत नाही तोच इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेली पस्तिशीतील महिला तटकन उभी राहिली आणि विमान थांबवण्याची मागणी केली. ते ऐकून एअर होस्टेस, को पायलट व केबिन क्रू तिच्याजवळ आले. काश्मिरात अतिवृष्टी होत असल्याचा फोन आल्याने जायचे नसल्याचे ती सांगू लागली.
कॅबिन क्रूने हात टेकले
विमान थांबवणे शक्य नसल्याचे केबिन क्रूसह प्रवाशांनी तिला ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. हे आधी समजत नव्हते का? अशा कडक शब्दांत दम दिला. पण सर्व व्यर्थ गेले. मग स्पाइसजेटच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून तिला उतरण्याची परवानगी दिली. मात्र, विमान दिल्लीत उतरत नाही तोपर्यंत चिकलठाणा विमानतळ सोडायचे नाही, अशी अट घातली. विमानतळाचे व्यवस्थापक डी. जी. साळवे यांनी हा स्पाइस जेटच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगितले.
(संग्रहित छायाचित्र)