आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी तलाठय़ांनी फोडला जिल्हा प्रशासनाला घाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सातबारा, फेरफाराचे अधिकार हाती असल्याने एखादी चुकीची नोंद झाली तर चार पिढय़ा तहसीलचे उंबरठे झिजवत राहतात, असे म्हणतात. याच तलाठय़ांच्या नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठी जिल्हा प्रशासनाला चार दिवस घाम गाळावा लागला. शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील निम्म्यापेक्षा अधिक अधिकारी याच कामाला तैनात आहेत. जिल्हाधिकारी विक्रमकुमार स्वत: या प्रक्रियेत लक्ष घालून आहेत.

रविवारी तलाठय़ांच्या 54 पदांसाठी जिल्ह्यातील 133 केंद्रांवर ही परीक्षा झाली. 11 हजार 500 उमेदवारांनी अर्ज केले होते. मदतीसाठी बनावट उमेदवार असल्याची तक्रार आल्यानंतर शनिवारी दुपारपासूनच स्वत: जिल्हाधिकारी विक्रमकुमार शोध घेण्याच्या कामाला लागले. रविवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत ते स्वत: यादी तपासत होते. एकाच्या मदतीसाठी दुसरा बनावट उमेदवार त्यांना सापडल्यानंतरच ते झोपण्यासाठी गेले.

रविवारी यातील 10 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बनावट उमेदवाराला पकडण्यासाठी विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत सापळा लावण्यात आला होता. अन्य विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यात व्यत्यय येऊ नये यासाठी परीक्षेची वेळ संपत आली असताना कारवाई करून दोघांना गजाआड करण्यात आले. येथे सगळे संपले असे वाटत होते, परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. रात्री उशिरा आदर्श उत्तरपत्रिका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आणि त्यापाठोपाठ सोमवारी निकालही जाहीर केला जाणार होता.

प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेतील उत्तरे चुकीची असल्याची तक्रार 15 विद्यार्थ्यांनी केली. जिल्हाधिकार्‍यांकडे ही तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी केली असता दोन उत्तरे चुकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा नव्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेण्यात आले.

अधिकारी गोपनीय कामात : पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या अधिकार्‍यांवरच जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर तक्रारी आल्या. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होऊ नये यासाठी दुसर्‍या टप्प्यात सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच अन्य कनिष्ठ कर्मचार्‍यांनाही मदतीला घेण्यात आले. त्यामुळे सोमवारी दुपारपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट होता. मंगळवारी विक्रमकुमार दालनात बसून होते, तर अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दालनात शुकशुकाट होता. उपजिल्हाधिकारी कोठे आहेत, अशी विचारणा त्यांच्या कार्यालयात केली असता कोणालाही माहिती नव्हते. ज्यांना माहिती होते, त्यांनी ‘साहेब गोपनीय कामगिरीवर आहेत’ असे उत्तर दिले. ही गोपनीय कामगिरी म्हणजे नव्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि तातडीने निकाल जाहीर करणे होते.

उमेदवारांची शक्कल, चुकांमुळे निकालास वेळ
या परीक्षांचे अन्य जिल्ह्यांतील निकाल वेळेत जाहीर झाले होते. तुलनेने औरंगाबाद जिल्हा मागे असल्याने मंगळवारी सर्वांना सक्तीने या कामाला लावण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तो जाहीर होण्याची शक्यता आहे. तलाठी होण्यासाठी काहींनी लढवलेली शक्कल, त्यानंतर समोर आलेल्या चुका यामुळे गेले चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा घामाघूम झाली आहे.

प्रत्येक तक्रारीची घेतली दखल
ही परीक्षा पारदर्शक आहे. त्यात काही तक्रारी आल्यानंतर लगेच कारवाई करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत पारदर्शकतेला तडा जाऊ नये ही इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यात आली. यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागली खरी, पण ते आमचे कर्तव्यच आहे. विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.