आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉकिंग पाॅइंट - खऱ्या बंडोबांना कोण आवरणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल खासदार चंद्रकांत खैरे बाळकृष्ण नगरात पोहोचले. तेथे महापौर कला ओझा युतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद््घाटन खैरेंनी केले. ओझांच्या कार्यालयासमोरच भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता रत्नपारखी यांचे कार्यालय आहे. त्याकडे पाहत पाहत खासदार महोदयांनी बरीच आगपाखड केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरून युती झाली. मग संघ समर्थक असलेल्या रत्नपारखी रिंगणात का उतरल्या, त्यांनी माघार का घेतली नाही, असा त्यांचा सवाल होता. त्यांनी विचारणा उमेदवाराला केली असली तरी त्यांचा अंगुलीनिर्देश भाजपचे पदाधिकारी, संघाच्या जाणत्या नेत्यांकडे होता. वरवर पाहता खैरे केवळ महापौर औझांच्या निवडणुकीचा मार्ग निर्वेध व्हावा, यासाठी बोलले असतील, असे काही जणांना वाटू शकते. कारण खैरेंनी कायम ओझांची पाठराखण केली आहे. त्यांची उमेदवारी धोक्यात आली असताना भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्यासाठी रामनगर वॉर्ड खुला करत बाळकृष्णनगर ओझांसाठी खेचून आणले. त्यामुळेही त्यांना ओझांची अधिक काळजी वाटत असावी, असाही ग्रह होऊ शकतो. असे म्हणतात की, जेव्हा युतीची बोलाचाली सुरू होती त्या वेळी खैरे यांनी फारशी सक्रिय भूमिका बजावली नाही. मात्र, समर्थनगरमध्ये स्वत:चा मुलगा ऋषिकेश, गुलमंडीवर स्वत:चा पुतण्या सचिन आणि बाळकृष्णनगरात ओझा यांना उमेदवारी देण्यापुरतेच ते आक्रमक होते. जागांची वाटणी झाल्यावर कोणता नेता कोणत्या वॉर्डाची जबाबदारी घेणार, असाही प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा खैरेंनी गुलमंडी, समर्थनगर, बाळकृष्णनगर असा क्रम निश्चित केला. त्यातही समर्थनगर, बाळकृष्णनगर आणि नंतर गुलमंडी असा त्यांचा प्राधान्यक्रम होता. मात्र, त्यात पूर्ण सत्यांश नाही. स्वत:च्या गोतावळ्यातील उमेदवारांभोवतीच नेत्यांचे लक्ष केंद्रित झाले, ही वस्तुस्थिती आहेच. आधी मुलाला, सुनेला, बायकोला किंवा आईला तिकीट द्यायचे आणि नंतर त्यांना निवडून आणण्यासाठी स्वत:चे सारे वजन खर्ची करायचे, असा प्रकार सर्वपक्षीय नेते करत आहेत; परंतु प्रचाराचा टेंपो वाढू लागताच बंडखोरीच्या वाढलेल्या तणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. केवळ समर्थनगर, गुलमंडी आणि बाळकृष्णनगरातील बंडखोरी मुख्य धोका नाही, तर इतर अनेक वॉर्डांत बंडखोर बलवान झाले असल्याचे आणि त्यांची ताकद वाढत असल्याचे नेत्यांच्या लक्षात आले आहे. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी तर ७५ वॉर्डांत बंडखोरी असून त्यातील निम्मी शिवसेनेच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. शिवसेनेकडून असा अधिकृत आकडा जाहीर झाला नसला, तरी किमान १५ वॉर्डांत शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला चारीमुंड्या चीत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. एमआयएममधील बंडखोरीतून तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार ओवेसी प्रचाराला आल्यावरच या बंडखोरांविषयी त्यांचे धोरण स्पष्ट होऊ शकेल. मात्र, अनेक वर्षे सत्तेत राहिल्यामुळे युतीच्या बंडखोरांना मोर्चेबांधणीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे सेनेचे बंडखोर आम्ही शिवसेनेचेच आहोत. निवडून आल्यावर सेनेसोबतच राहणार आहोत. केवळ नेत्यांनी आमच्यावर अन्याय केला म्हणून मैदानात उतरलो आहोत, असे सांगत आहेत. भाजपचे बंडखोरही पक्षाचे कौतुक करत नेत्यांच्या नावाने बोंब ठोकत मतदारांकडे जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही वॉर्डांत चेहरे बंडखोरांचे असले तरी त्यांच्या मागे खरी ताकद युतीच्या स्थानिक नेत्यांचीच आहे. तू बिनधास्त उभा राहा. तुला मी पूर्ण रसद पुरवतो. निवडून आल्यावर मी सांगेन तेच करावे लागेल. मी तुला मोठे पद मिळवून देतो, असा नेत्यांचाच सांगावा आहे. त्यामुळे बंडोबांच्या मागील खऱ्या बंडखोरांना आवर घालणे कठीण जात आहे. प्रचारातील अखेरच्या टप्प्यात युतीचे बडे नेते जाहीर सभांमधून बंडखोरांना थारा देऊ नका. त्यांना मतदान करणे म्हणजे विरोधकाची ताकद वाढवणे, असे म्हणतील. आतापर्यंतचा अनुभव आणि औरंगाबादच्या मतदारांची मानसिकता लक्षात घेता बंडखोरांना फारसा थारा मिळणेही कठीण आहे. मात्र, वॉर्डातील लढाई काट्याची असते. दोन-पाच मतेही निकाल बदलून टाकतात. अशा स्थितीत नेत्यांनी केलेल्या अन्यायाची लाट युतीच्या बंडखोरांनी वाढवली तर पाच-सात जागांवर फटका बसणार आहे. याची जाणीव खैरे आणि इतर मंडळींना झाली असावी. त्यामुळे त्यांनी गोतावळ्याच्या हितासाठी का होईना हा आक्रमक प्रचार सुरू केला आहे. युतीचा धर्म पाळायचा असेल तर पुढील काळात हा प्रचार त्यांना केवळ तीन वॉरडांपुरता मर्यादित ठेवता येणार नाही. त्यांचे सहकारी, मित्रपक्षातील नेत्यांनाही बंडखोरी वाढलेल्या वॉर्डांत हेच करावे लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, फक्त गोतावळा एवढेच ध्येय ठेवून स्वत:च उभ्या केलेल्या बंडोबांना शांत करण्याची धमक आणि इच्छा या नेत्यांमध्ये आहे का?