आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संशयकल्लोळ’ नंतर संगीत नाटकाला माझा पूर्णविराम, नव्या पिढीने पुढे यावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - अभिजात शास्त्रीय संगीताला नव्या पिढीने अक्षरश: डोक्यावर घेतले याचे श्रेय ज्या कलावंताला जाते असे प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी मंगळवारी औरंगाबादकरांना दिवाळीची स्वरभेट दिली. यानंतर ‘दिव्य मराठी’ कार्यालयात झालेल्या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी त्यांच्या संगीत आराधनेच्या प्रारंभापासून आजपर्यंतच्या विविधांगी पैलूंवर भाष्य केले. या वेळी दर्दी रसिकांच्या जिवाला चटका देणारी, पण नव्या प्रयोगांना अन् कलावंतांना दिशा देणारी बाब त्यांनी सांगितली. गेल्या काही वर्षांत संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करणारे राहुल म्हणाले की, ‘संशयकल्लोळ’चे शंभर प्रयोग झाल्यानंतर मी संगीत नाटकांना पूर्णविराम देणार आहे.आता शास्त्रीय संगीतातल्या नव्या पिढीनेत्यासाठी पुढे यावे, अशी माझी इच्छा आहे.  

सात वर्षांपूर्वी मी संगीत नाटकाला सुरुवात केली. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर मी ‘संशयकल्लोळ’ही केले. सर्वच प्रयोगांना उदंड प्रतिसाद मिळाला. पण प्रतिसाद मिळत राहतो म्हणून तेच तेच करणे म्हणजे सृजनशीलता चौकटीत अडकवून ठेवणे आहे. यासाठी नव्या पिढीने आता पुढे यावे. आजच्या काळाशी सुसंगत नव्या पिढीची पटकथा असलेल्या संगीत नाटकांची निर्मिती व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

तरुणाईच्या हृदयात ‘शास्त्रीय’चे घर  
राहुल म्हणाले की, आज इंटरनेटमुळे संपूर्ण जगातील कलावंत तरुणाईला मोबाइलवर उपलब्ध झाले आहेत. पण तरीही तरुणाईला शास्त्रीय संगीताने भुरळ घातली आहे, ही संगीताची जादू अन् त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांच्या कामाचे फलित आहे. अलिकडे कार्यक्रमांना ७०-७५% तरुण असतात, ही बाब संगीताचा सन्मान वाढवणारी आहे. निश्चितच ‘कट्यार’नंतरच्या या दोन-तीन वर्षांत शास्त्रीय संगीत तरुणाईवर गारूड करू लागले आहे. पण, आता कट्यार भरपूर झाले. नवे कलावंत नव्या प्रयोगांसह पुढे यायला हवेत.  

आई-वडिलांचे संस्कार ठरले दिशादर्शक  
मला शास्त्रीय गायकीचा वारसा आजोबा वसंतराव देशपांडे यांच्याकडून मिळाला. पण, आईवडिलांच्या संस्कारांमुळे तो जोपासला गेला. आजोबा राग मारवा गायचे. पण हा राग गायला अवघड असल्याने मी तो गात नाही. मी इंग्रजी शाळेत शिकलो, पुण्यासारख्या शहरात वाढलो. पण संस्कार असल्याने सभोवतालचे वातावरण आणि संगीतांची सांगड घालणे सोपे झाले.   

पुण्याबाहेर बैठक करायला निश्चितच आवडेल  
मी सतत नवे प्रयोग करत राहतो. पुण्यातील ‘बैठक’ हा  शास्रिय संगीताची ओळख करून देणारा पुण्यातील  कार्यक्रम हा माझ्यातील प्रयोगशिलतेचाच उपक्रम होता. मी कल्पना मांडली अन् त्याला प्रतिसाद मिळाला. पुणे माझ शहर आहे. मी तिथे वाढलो, माझा मित्र परिवार तिथे आहे. त्यामुळे माझ्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी बळ लगेच मिळाले. बैठकीची कल्पना मांडली अन् साडेतीन हजार रसिक श्रोते आले. यामध्ये संगीतावर आम्ही बोललो, बारकाव्यांवर संवाद साधला. यातून कानसेन तयार होतात. संगीत कसे ऐकावे ही कला मी त्यांना सांगू शकलो. पुण्याबाहेरही असे प्रयोग करायला मला नक्कीच आवडेल. पण, पुण्यात मी ते सहज करू शकतो, बाकी ठिकाणी मदतीला कुणी पुढे आले तर नक्कीच करीन.  

ऑनलाइन चर्चा, मैफलीला उदंड प्रतिसाद   
मी आॅडिओ ब्लाॅग करतो, त्याला जवळपास ६८ देशांतून प्रतिसाद मिळतो आहे. एक तासाचा कार्यक्रमाची वेळ मी कमी करायला गेलो तर लगेच कॉमंेंट्स आल्या की, हा कार्यक्रम कमी करू नका. यावरून त्याचे महत्त्व अधोरेखित होते. नव्या पिढीला याची आवड आहे, फक्त माध्यम बदलले आहे. प्रत्येक पिढीने आपापल्या  काळानुसार   संगीताला योगदान दिले आहे. मी माझा वाटा उचलला आहे. आता इतरांनीही पुढे यायला हवे.  

कार्यक्रम संपल्यावरही श्रोते हलत नाहीत ही पावतीच  
हल्ली जीवन वेगवान झाले आहे. काम संपले की कुणीही एक क्षणभरसुद्धा थांबायला तयार होत नाही. अशा वेळी दोन-तीन तासांची मैफल संपल्यानंतरही जेव्हा श्रोते उठायला तयार नसतात तेव्हा मी ती स्वरांची शक्ती आहे, असे समजतो. ही माझ्या प्रांजळ प्रयत्नांची पावती आहे, असे मी मानतो.  

औरंगाबादकर रसिकांना सलाम  
शहरातील आजच्या कार्यक्रमात रसिकांनी चार तास गर्दी केली होती. काहींना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. उन्हात लोक बसून होते. ऊन वाढू  लागले की, लोक निघून जातात. पण, आज मी पाहिले, एकही श्रोता जागा सोडून गेला नाही. हे खूप मोठे यश आहे. ते माझे यश नव्हे, तर स्वरांच्या हुकुमतीची ही जादू आहे.

लहानपणी शास्त्रीय आवडत नव्हते  
मला लहानपणी शास्त्रीय संगीत फारसे आवडत नव्हते. गायन करणे तर दूर, मी ऐकायचोसुद्धा नाही. मी मायकल जॅक्सन ऐकायचो. ब्रायन अॅडम्स, मराय कॅरे, सेलिन डिऑन ही मंडळी माझी आवडती होती. त्यांना मी खूप ऐकले आहे. पण, तरीही शास्त्रीय संगीताच्या जादूने मला खेचून नेलेच. आजही मी पाश्चात्त्य गायनाचा चाहता आहेच. मात्र, शास्त्रीय संगीताची सेवा सुरूच राहील.  

टाळ्यांच्या मागे जाऊ नका  
एखाद्या कार्यक्रमात टाळ्या पडल्यावर तेच तेच गात राहणे मला रुचत नाही. ‘कट्यार’च्या प्रत्येकच पदाला टाळ्या मिळतात म्हणून मी तेच करत राहणे सृजनशील व्यक्तीचा परिचय देणारे नाही. अशाने कलावंत टाळ्यांच्या चौकटीत अडकतो. रसिक श्रोत्यांना जे आवडेल, रुचेल ते गाण्यासोबतच आपलेही नवे काही त्यांना देत राहायचे असते. असा प्रयोग मी वारंवार करतो अन् त्याला प्रतिसाद मिळतो. मी कानावर हात ठेवतो हे पाहून काहींना वाटते मी तान घेतो आहे आणि ते टाळ्या वाजवतात. माझा मात्र तो स्वत:ला ऐकण्याचा प्रयत्न असतो.  

दिवाळी अंकात भारतीय परंपरांचे जतन महत्त्वाचे
आशयघन आणि वैविध्यपूर्ण विषयांनी परिपू्र्ण असलेल्या दैनिक ‘दिव्य मराठी’च्या  दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या हस्ते मंगळवारी (१७ ऑक्टोबर) झाले. विविधांगी विषयांना स्पर्श करीत असताना भारतीय परंपरा जपणारा हा सुंदर अंक आहे, अशा शब्दांत देशपांडे यांनी या अंकाचे कौतुक केले.   

‘दिव्य मराठी’ कार्यालयात हा स्वरमयी सोहळा झाला. या वेळी राहुल देशपांडे  म्हणाले की, ‘महाराष्ट्रात दिवाळी अंकांची एक आगळीवेगळी परंपरा आहे. भरघोस वैचारिक खाद्य असलेले दिवाळी अंक प्रत्येकाच्या पसंतीस उतरणारे आहे. ‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकात सर्व प्रकारच्या वाचकांना  आवडेल असा मजकूर देताना भारतीय परंपरांचे जतन आवर्जून करण्यात आले, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.’

दीक्षित म्हणाले, की ‘दिव्य मराठी दैनिकातील वेगळेपणा जपत असतानाच दिवाळी अंकांतही ते वैशिष्ट्य जपून आहे. ‘दिव्य मराठी’चा  संपादकीय विभाग दरवर्षी नवे, ताजे काही देण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. त्याला वाचकांचा प्रतिसाद मिळतो हेच यशाचे द्योतक आहे. यंदाच्या दिवाळी अंकातही राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि कलाविश्वापासून उद्योग आणि क्रीडा जगतापर्यंतचा वेध घेतला आहे.’ निशित जैन म्हणाले की, ‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाला मिळणारे पुरस्कार ही संपूर्ण टीमसाठी सन्मानाची बाब आहे. 

या अंकासाठी सखोल नियोजन, सूत्रबद्ध विचारांची शृंखला असते अन् ‘दिव्य मराठी’ परिवारातील प्रत्येक सदस्य यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. सर्वांच्या प्रयत्नातून हे यश मिळाले आहे. या वेळी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित, सीओओ निशित जैन, निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड अमित डिक्कर, अकोला- अमरावती युनिट हेड सुभाष बोंद्रे, ‘दिव्य मराठी’ मधुरिमा क्लबच्या महाराष्ट्र प्रमुख वृषाली घाटणेकर, एचआरचे युनिट हेड अन्वर अली,  समन्वयक शैलेश इंदाणी, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश राऊत, डॉ. संदीप शिसोदे यांची उपस्थिती होती. निवासी संपादक दीपक पटवे यांनी प्रास्ताविक केले.  

आशयघन अन् वैविध्यपूर्ण  
वाचकांना भावतील, रुचतील अशा विषयांची आशयघन, वैविध्यपूर्ण मांडणी हे ‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. त्यात पर्यटन, धर्म, राजकारण, चित्रपट, छायाचित्रांची दुनिया, आत्मकथन असे विविध विषय वेगळ्या शैलीत मांडले आहेत. भाजपचे एकेकाळचे धुरीण गोविंदाचार्य यांची शशिकांत सावंत यांनी घेतलेली मुलाखत, सचिन परब यांनी गोव्यातील संस्कृतीचे घेतलेला वेध, सावरकर आणि जिना यांच्याविषयी राज कुलकर्णी यांनी केलेले मंथन नव्या विचारांना दिशा देणारा ठरेल. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आठवणीतले दिवस’ या आत्मचरित्रातील संपादित उतारा या अंकात आहे. प्रख्यात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या लेखणीच्या फटकाऱ्यातून आलेला ‘कधी कधी जाने भी दो यारो’ हा लेख वेगळ्याच दुनियेचे दर्शन घडवणारा आहे. दीपांकर यांनी सांगितलेली प्रियंका चोप्राची लक्षवेधी कहाणी सर्वांना दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच आहे. गणेश बागल यांचे मुखपृष्ठ मिलिंद जाधव यांनी टिपलेले ‘राबते हात’ असा मोठा खजिना रसिकांसाठी आहे.
 
पुढील स्‍लाइडवर पहा आनखी फोटो...
बातम्या आणखी आहेत...