आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - महिनाभरापूर्वी टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी झालेला तनप्पा पेरिस्वामी हा पीईएस पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आता पूर्णपणे बरा झाला आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असताना मित्रपरिवार, प्राचार्य, प्राध्यापक, कमलनयन बजाज रुग्णालय प्रशासन यांच्या प्रयत्नामुळे त्याचे प्राण वाचले. जीवन-मृत्यूच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर आता महाविद्यालयीन परीक्षेसाठी तो पूर्णपणे सज्ज झाला आहे.
केवळ पैशाच्या कमतरतेमुळे तनप्पावरील उपचार थांबू नयेत म्हणून ‘दिव्य मराठी’ने वृत्ताच्या माध्यमातून वेळोवेळी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्यावर यशस्वी उपचार झाले. तनप्पा पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षात शिक्षण घेतो. 8 मार्चला दुचाकीवरून जाताना त्याला टेम्पोने धडक दिली होती. यात त्याच्या दोन्ही पायांना सहा फ्रॅक्चर आणि मेंदूवर आघात झाला होता. तो कोमात गेला होता, डॉक्टरांनीही आशा सोडली होती. पण सर्वांच्या मदतीनंतर त्याचे प्राण वाचले आहेत.
औद्योगिक सहल रद्द करून जमवले पैसे : तनप्पाचे आई-वडील गोळ्या-बिस्किटांची विक्री करून उदरनिर्वाह चालवतात. त्याला दोन बहिणी असून त्याही नेहमी आजारी असतात. कटकट गेट भागात त्याचे छोटेसे घर आहे. तनप्पावरील उपचारासाठीच्या खर्चाचा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांसमोर होता. पण महाविद्यालयातील मित्रांनी ऐनवेळी औद्योगिक सहल रद्द करून 49 हजार रुपये जमवले होते.
प्राचार्य, प्राध्यापकांनीही मदत केली. यात प्राथमिक उपचाराचा खर्च भागला. नंतर मात्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य जितेंद्र दहाडे यांनी शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. तर रोहित तुपे, वैभव नाडे, अक्षय मिसाळकर, अमोल चव्हाण या मित्रांनीदेखील तनप्पाच्या परिवाराला आधार दिला. 18 दिवस तो अतिदक्षता विभागात होता. यादरम्यान कमलनयन बजाज रुग्णालयाचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एस.व्ही संतापुरे, न्यूरोसर्जन डॉ. के. एन टिंगरे यांनी तनप्पावर उपचार केले. विश्वस्त सी. पी. त्रिपाठी आणि डॉ. नीरज उत्तमणी यांच्यामुळे त्याचा उपचाराचा आर्थिक भार कमी झाला.
‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा
उपचाराच्या खर्चाची अडचण असताना ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन कमलनयन बजाज रुग्णालय प्रशासनासमोर सर्व परिस्थिती मांडली. प्रशासनानेदेखील याचे गांभीर्य ओळखून उपचारासाठी सहकार्य केले. चार दिवसांपूर्वीच त्याला डिस्चार्ज मिळाला असून तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.तनप्पावर यशस्वी उपचार झाले असून त्याला डिस्चार्ज मिळाला.
शिक्षणासाठी अख्खे कुटुंब शहरात
तनप्पाने मागील वर्षी दिल्लीतील रोबोटिक्स स्पर्धेत मराठवाड्याचे प्रतिनिधित्व केले होते. संपूर्ण कुटुंबात तो एकटा उच्च शिक्षण घेत आहे. त्याच्या शिक्षणासाठी त्याचे पूर्ण कुटुंब तामिळनाडूमधून शहरात राहण्यासाठी आले. अपघातातून बरा झाल्यानंतर तो आता 12 एप्रिलला होणार्या परीक्षेचा अभ्यास करत आहे. जितेंद्र देहाडे यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून त्याला व्हीलचेअर देण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन शाखेत त्याला उत्तम अभियंता बनायचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.