आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनवाणी, आहुजा यांच्या मुक्कामात झाली वाढ, आज निकाल जाहीर होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; मकबऱ्यानजीकच्या रेणुका आणि ताजमहाल काॅलनीत बनावट भूखंड विक्री केल्याप्रकरणी नगरसेवक राजू तनवाणी आणि राज आहुजा यांच्या जामीन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी सुरू झाली. उभयपक्षांच्या युक्तिवादानंतर निर्णय राखीव ठेवण्यात आला. यावर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता निकाल जाहीर केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
तनवाणी आणि आहुजा दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सोमवारी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी त्यावर सुनावणी सुरू झाली. यादरम्यान या दोघांनी नागरिकांना कोट्यवधींना गंडवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवून पंचनामे केले आहेत. अनेक साक्षीदारांचा जबाब नोंदवणे बाकी आहे. या फसवणुकीत शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याने त्यांची नावे समोर आली आहेत. या गुन्ह्यातील सबळ पुरावे उपलब्ध करण्यात येत आहे.
तनवाणीला जामीन दिला तर तो साक्षीदार आणि संबंधित मालमत्ता खरेदी केलेल्या नागरिकांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे त्या दोघांना जामीन देण्यात येऊ नये, अशी बाजू सहायक लोकअभियोक्ता बी. के. पवार यांनी मांडली. तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. अशोक ठाकरे, अॅड. दिनेश गंगापूरवाला यांनी आरोपी अटक होण्यापूर्वीपासून ते पोलिस कोठडी संपेपर्यंत पोलिसांचा तपास सुरू आहे. राज्य शासनाने २७ सप्टेंबर २००९ रोजी विनानोंदणीकृत खरेदीखत असलेले प्लॉट आणि घर नियमित करण्याचा आध्यादेश अप्पर सचिवांनी जारी केलेला आहे. केलेली प्लॉटिंग अनधिकृत असताना वीजपुरवठा, मनपाचा घरपट्टी कर लावण्यात आला आहे, माझ्या विरुद्ध कोणाची तक्रार नाही, कोरडे आणि सोनवणे या दोघांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू असून त्यात आरोपीचा संबंध नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी उभयपक्षाच्य युक्तिवादानंतर निकाल राखीव ठेवला.

दलालांवरगुन्हे दाखल करणार : याप्रकरणात प्लॉट विक्रीसाठी तनवाणी,आहुजा यांनी दलाल नेमले होते. दलालाच्या माध्यमातून प्लॉट विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. तसेच याच परिसरातील गट क्रमांक ९९/१ मध्येदेखील अनधिकृत प्लॉट विक्री केल्याचे समोर आल्यामुळे प्लॉट विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असून ते कामही प्रगतिपथावर सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बिल्डरवरही गुन्हा
तनवाणीआणि राज आहुजा यांनी ज्याप्रमाणे जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार केला होता त्याप्रमाणे इतर काही लोकांनीदेखील या जमीनीची खरेदी करून प्लॉट विकले आहेत. त्यात रऊफ पठाण, एक बिल्डर आहे. त्यांच्यावरदेखील गुन्हे दाखल होतील, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. सोनवणे यांचीदेखील या प्रकरणात चौकशी होणार आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.