आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी समस्या: मराठवाड्यात 244 टँकरने पाणीपुरवठा, 3 मोठे प्रकल्प कोरडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा खालावत चालला आहे. तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. मराठवाड्यात १७९ गावे आणि ७४ वाड्यांना २४४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक टँकरची संख्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. मराठवाड्यात आतापर्यंत ६५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
मराठवाड्यातल्या मोठ्या प्रकल्पांपैकी मांजरा, निम्न तेरणा आणि माजलगाव हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर जायकवाडी धरणात २६.२७ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये एकूण पाणीसाठा १३०८ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा ५७० दलघमी इतका आहे. येलदरी धरणात ३२ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २५९ दलघमी इतका आहे. विष्णुपुरी धरणात ३९ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा ३१ दलघमी इतका आहे.
आतापर्यंत ४६ दलघमी पाणी सोडले:
सध्या जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत ४६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक टँकर
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ८० गावांना १०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात ३३, नांदेड ४८, बीड ३२, लातूर १६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबादमध्ये १०६, लातूरमध्ये १४४, उस्मानाबादमध्ये १३७ जालनामध्ये ४९, नांदेडमध्ये १४७ आणि बीडमध्ये ६१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.