आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशासाठी बुद्ध्यांकापेक्षा भावनांक अत्यंत महत्त्वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यश मिळवण्यासाठी बुद्ध्यांक महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ हुशार असून चालत नाही तर भावनांक अधिक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत व्हेरॉक ग्रुपचे एमडी तरंग जैन यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २९ व्या "रेअर शेअर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात जैन यांनी अनुभव कथन केले. या वेळी कोलकात्यातील त्यांचे बालपण ते औरंगाबादमध्ये सुरू केलेला व्यवसाय याचे वर्णन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम भोगले होते. सतीश कागलीवाल, सी. पी. त्रिपाठी, सुनील देशपांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. जैन म्हणाले, आपल्या व्यक्तिमत्त्वावर आईचा सर्वाधिक प्रभाव पडला आहे. मूल्याला महत्त्व देण्याची शिकवण आईकडून मिळाली. १९८३ मध्ये महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर बजाजमध्ये काम करताना व्यवस्थापन प्रणाली शिकता आली. १९९० मध्ये व्हेरॉक ग्रुपचा व्यवसाय १.२ कोटीचा होता. आज हा व्यवसाय ७,८०० कोटी रुपयांचा आहे. २०२० मध्ये आमचे उद्दिष्ट २० हजार कोटींचे आहे. दुचाकींसाठी सुटे भाग पुरवठा करण्यात व्हेरॉक ग्रुप तिसऱ्या स्थानावर आहे. चारचाकी वाहनांसाठी देशातून ऑर्डर मिळत नव्हत्या त्या वेळी जनरल मोटर्सची आॅर्डर मिळाली. होंडाची ऑर्डर सुरुवातीला मिळाली. त्यानंतर ती जपानला देण्यात आली; परंतु सतत बारा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर ऑर्डर मिळवण्यात यश आल्याचेही त्यांनी म्हटले.

झपाटून काम करणे गरजेचे
संस्थामोठी करायची असेल तर त्यामध्ये लीडर असणे आवश्यक आहे. लीडर आणि मॅनेजरमधील फरक सांगताना ते म्हणाले, लीडर निर्णय घेतात; पण मॅनेजर सांगितले तेवढेच काम करतात. आपल्या अंगावर जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे संस्था वाढवायची असल्यास त्यामध्ये जागतिक दर्जाचे लोकदेखील असले पाहिजेत. मी व्यवसाय करताना कायम धोका पत्करला. मूल्य सांभाळून श्रीमंत होण्याचे ध्येय ठरवले होते, असे जैन म्हणाले. धोके पत्करल्यामुळे मला त्याचा नेहमीच फायदा झाला. यशस्वी होण्यासाठी झपाटून काम करणे गरजेचे आहे. तसेच प्रचंड मेहनतीशिवाय कोणताच पर्याय नाही. अनेकदा कंपनीतील अधिकाऱ्यांत बुद्ध्यांक पाहायला मिळतो, पण भावनांक नसेल तर अनेकदा संधी असूनही त्याला ती पाहता येत नाही.

शहरासाठी काम करू
याकार्यक्रमात देशपांडे यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी औरंगाबाद शहराच्या विकासासाठी तसेच नवीन तरंग जैन निर्माण करण्यासाठी काय कराल, असे विचारल्यानंतर त्यांनी समर्पकपणे उत्तर दिले. तुमच्या मनातील प्रस्ताव द्या उद्योजक घडवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या शहराने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे त्याला परत देणेही मी महत्त्वाचे मानतो. शहराच्या विकासासाठी जे काही करणे गरजेचे आहे त्यासाठी मी केव्हाही तयार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.