आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंटामुक्त गाव समितीत निवडीवरून गोंधळ, वाद टाळण्यासाठी इच्छुकांची ठाण्यात समजूत काढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - महात्मागांधी तंटामुक्त गाव समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून वाळूजच्या ग्रामसभेत रविवारी गोंधळ झाला. इच्छुकांच्या बाजूने किती मतदार आहेत हे दर्शविण्यासाठी ग्रामसभेसमोर मतदारांना सादर करण्यास भाग पाडल्यामुळे अभूतपूर्व पोलिस संरक्षणातील ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अखेर ग्रामसभा तहकूब करणे भाग पडले.
वाळूजला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सुभाष तुपे अध्यक्षस्थानी होते. ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे यांनी विषयपत्रिका वाचून दाखविली. त्यात मागील सभेचा अहवाल सादर करणे, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविणे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष सदस्यांची निवड करणे हे विषय ठेवण्यात आले होते. प्रारंभीचे दोन विषय झाल्यानंतर तंटामुक्त ग्राम समितीसाठी इच्छुकांची नावे बोलावण्यात आली. त्यात शेख जमील अहेमद, नितीन साबळे, अश्फाक कुरेशी, सईदाबी पठाण, काकासाहेब चापे, अजमतखाँ पठाण आदी सहा जणांची नावे आली. प्रथम साबळे यांना ग्रामसभेपुढे बोलावण्यात आले. त्यानंतर साबळेंना कुणाचा पाठिंबा आहे? असे ग्रामविकास अधिकारी लव्हाळे यांनी ग्रामस्थांना विचारले. मात्र त्यांना कुणीही पाठिंबा दिला नाही.

या प्रकारानंतर साबळेंसह जमील शेख, अमजतखाँ पठाण, अश्फाक कुरेशी आदींनी आपापली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर काकासाहेब चापे सईदाबी पठाण हे दोघेच इच्छुक अध्यक्षपदासाठी राहिले. तेव्हा या दोघांना पाठिंबा देणाऱ्यांना विभागून बसण्याचे सांगण्यात आले. ग्रामसभेचे अध्यक्ष तुपे यांनी मतदारांची मोजणी करण्याचे निर्देश दिले. तेव्हा माजी उपसरपंच खालेदखाँ पठाण, जमील शेख, नदीम झुंबरवाला, रवींद्र मनगटे, आसाराम जमधडे, बाबासाहेब पारधे आदींनी वाद टाळण्यासाठी मतदानापर्यंत जाता आपसात ठरवून एकाची बिनविरोध निवड करण्याची ग्रामसभेला सूचना केली. ग्रामस्थ सरळ दोन जातींमध्ये विभागले गेल्याने वाद टाळण्यासाठी सरपंच तुपे, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी ग्रामसभा तहकूब केल्याचे जाहीर करून ग्रामसभेतून काढता पाय घेतला.
सर्व पदे रिक्तचा ठराव
गावातशांतता कायम राहावी या उद्देशाने तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासह सर्व पदे रिक्त ठेवण्यात आल्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतीतर्फे पोलिसांना तहसील कार्यालयास देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी लव्हाळे यांनी पत्र तयार केले. त्यावर सरपंच तुपे, माजी सरपंच मुकेश बोहरा, सईदाबी पठाण, बाबासाहेब पारधे, खालेदखाँ पठाण यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. या पत्राची एक प्रत ग्रामपंचायतीकडून मिळणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सांगितले. ग्रामसभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. ग्रामसभेला हजारांवर ग्रामस्थांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...